'शॉर्टकट'वाले 'ब्लॅकलिस्ट'मध्ये

स्पर्धा परीक्षेत कॉपी करून बाजी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ८३ जणांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कायमची बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या परीक्षार्थी उमेदवारांत ११ महिलांचाही समावेश आहे. कॉपी करण्यापासून ते खोटी प्रमाणपत्रे तयार करणाऱ्यांपर्यंत अनेकांचा यात समावेश आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Wed, 5 Jul 2023
  • 08:48 am
'शॉर्टकट'वाले 'ब्लॅकलिस्ट'मध्ये

'शॉर्टकट'वाले 'ब्लॅकलिस्ट'मध्ये

परीक्षेत कॉपी अथवा विविध गैरप्रकारांचा अवलंब करून उत्तीर्ण होऊ पाहणाऱ्या ८३ जणांवर एमपीएससीने घातली आजन्म बंदी

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

स्पर्धा परीक्षेत कॉपी करून बाजी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ८३ जणांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कायमची बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या परीक्षार्थी उमेदवारांत ११ महिलांचाही समावेश आहे. कॉपी करण्यापासून ते खोटी प्रमाणपत्रे तयार करणाऱ्यांपर्यंत अनेकांचा यात समावेश आहे.

गेल्या काही वर्षांत शिक्षक, आरोग्य, तसेच संयुक्त परीक्षांमध्ये घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द करण्याची वेळही सरकारवर आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांवरदेखील या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेतील घोटाळ्यांत सरकारी आणि खासगी व्यक्तीही सहभागी असतात. परीक्षेतही शॉर्टकटचा वापर करून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करणारे उमेदवारही असतात. अशा उमेदवारांवर एमपीएससीच्या वतीने कठोर कारवाई केली जात आहे. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार संबंधितांवर पाच वर्षे बंदीपासून ते कायमस्वरूपी बंदी घालण्याची कारवाई एमपीएससीच्या वतीने केली जाते.

परीक्षेत कॉपी करणाऱ्या ८३ जणांवर २०११ ते २०२३ दरम्यान कायमस्वरूपी बंदी घातल्याची माहिती एमपीएससीने नुकतीच जाहीर केली आहे. यात ७२ मुलांचा आणि ११ मुलींचा समावेश आहे. करनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झाम, असिस्टंट मोटर व्हेईकल निरीक्षक अशा विविध परीक्षांसाठी घोळ करणाऱ्यांचा यात समावेश आहे. कायद्याचे रक्षक म्हणून पोलीस विभागात भरती होण्यासाठी आलेल्या १८ उमेदवारांनीदेखील नियमांचे उल्लंघन करून परीक्षेत 'शॉर्टकट' वापरला. कॉपी पकडली गेल्याने त्यांना आजन्म परीक्षाबंदीचा सामना करावा लागला आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर म्हणाले, 'परीक्षेदरम्यान काही उमेदवार इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून कॉपी करताना आढळले आहेत. परीक्षेला डमी उमेदवार बसवण्याच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या वर्षी अहमदनगर येथील एका मुलीने उप जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार केले होते. त्यानंतर नागरी सत्कार देखील स्वीकारले. संबंधित प्रमाणपत्र खोटे असल्याचे नंतर सिद्ध झाले. काही उमेदवार एमपीएससीला खोटी कागदपत्रे सादर करतात. अशा व्यक्तींवर कायमस्वरूपी बंदी घातली जाते.'

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे म्हणाले, 'एमपीएससीच्या हेल्पलाईनवर अर्वाच्य भाषेत बोलणे, तांत्रिक यंत्रणेत छेडछाड करणे, चुकीचे ट्विट करणे, परीक्षेत कॉपी करणे अशा विविध कारणांमुळे परीक्षार्थींवर बंदी घातली जाते. प्रत्येकाच्या कृत्यानुसार त्याला काही वर्षांची बंदी ते कायमस्वरूपी बंदीचा सामना करावा लागतो. कायमस्वरूपी बंदी ही परीक्षेत कॉपी करण्यासाठी अथवा एमपीएससीची फसवणूक केल्याप्रकरणी दिली जाते. गेल्या बारा वर्षांत ८३ परीक्षार्थींवर एमपीएससीने कायमस्वरूपी बंदी घातली आहे.' एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे म्हणाले, एमपीएससीने कायमस्वरूपी बंदी घातलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, त्यांच्यावर नक्की बंदी का घातली? याची माहिती जाहीर करू शकत नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story