सुडौलपणा नाही धनिकांची मक्तेदारी

लठ्ठपणा येताना एकटा येत नाही. त्याच्याबरोबर हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार घेऊन तो येतो. याच्या बरोबरीने गुडघेदुखी, माकड हाडाचे दुखणे सोबतीला येऊ शकते. आता हे सर्व टाळण्यासाठी लठ्ठपणा कमी करावा लागतो आणि ते अशक्य असल्यास पाच ते आठ लाख खर्चून बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करावी लागते

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Mon, 19 Jun 2023
  • 12:10 am
सुडौलपणा नाही धनिकांची मक्तेदारी

सुडौलपणा नाही धनिकांची मक्तेदारी

ससूनमध्ये पाच ते आठ लाख खर्चाची बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया होणार मोफत, गरीब रुग्णांना मिळणार दिलासा

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

लठ्ठपणा येताना एकटा येत नाही. त्याच्याबरोबर हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार घेऊन तो येतो. याच्या बरोबरीने गुडघेदुखी, माकड हाडाचे दुखणे सोबतीला येऊ शकते. आता हे सर्व टाळण्यासाठी लठ्ठपणा कमी करावा लागतो आणि ते अशक्य असल्यास पाच ते आठ लाख खर्चून बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करावी लागते. आता हीच शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात मोफत होणार असल्याने गरीब रुग्णांना संजीवनी मिळणार आहे.  

बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा हा केवळ श्रीमंतांचा आजार राहिलेला नाही. सर्वच स्तरामध्ये लठ्ठपणा दिसून येत आहे. लठ्ठपणा अनेक रोगांना निमंत्रण देतो. ज्या व्यक्तींना वैद्यकीय समस्या असतात, त्यांना लठ्ठपणा असल्यास संबंधित रोगाची तीव्रताही वाढते. काही रुग्णांना लठ्ठपणामुळे रात्री झोपेत श्वास घेण्यास त्रास होतो. काहींना घोट्यावर, गुडघ्यावर अथवा माकड हाडावर दाब येतो. त्यामुळे हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. ज्या व्यक्तींना लठ्ठपणाचा आजार जडला आहे त्यांना वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीचा आहार आणि व्यायाम सांगितले जातात. त्यानंतरही वजन कमी होत नसल्याने बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया केल्याशिवाय पर्याय राहात नाही. खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपासून ८ लाख रुपयांपर्यंत या शस्त्रक्रियेचा खर्च येतो. प्रचंड खर्च होत असल्याने ही शस्त्रक्रिया सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाते. सुरुवातीच्या काळात आपले शरीर सुडौल राखण्यासाठी सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया म्हणून बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेकडे पाहिले जात होते. मात्र, लठ्ठपणा या आजारामुळे इतरही गंभीर आजार मागे लागतात. त्यामुळे या शस्त्रक्रियेची गरज सर्वच स्तरातील व्यक्तींना भासू शकते.      

ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर म्हणाले, जानेवारी महिन्यात सूत्रे हाती घेतल्यानंतर ४ महिलांवर आणि आठ पुरुषांवर अशा मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अगदी ३६ वर्षांच्या महिलेपासून ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचा यात समावेश आहे. या सर्वांना काही ना काही आजार होता. काहींना हिप आणि नी रिप्लेसमेंट सांगितली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांना आता त्याचा त्रास जाणवत नाही.

बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. अमेय ठाकूर म्हणाले की, बॉडीमास इंडेक्स (बीएमआय)  हा १८ ते २५ दरम्यान असल्यास तो सामान्य मानला जातो. २५ ते ३० पर्यंत बीएमआय असणारा व्यक्ती अधिक वजन असलेली मानली जाते. तीसपुढे बीएमआय असल्यास त्या व्यक्तीस लठ्ठपणा असल्याचे मानले जाते. कमी कॅलरीचा आहार घेणे, व्यायाम करणे असे उपाय केल्यानंतरही ज्यांच्या वजनात फारसा फरक पडत नाही, अशा लठ्ठ व्यक्तींना बॅरिअॅट्रिक सर्जरीचा सल्ला दिला जातो. लठ्ठ असलेल्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, गुडघेदुखी, मधुमेह, झोपेत श्वसनाचा अडथळा आदींपैकी एक आजार असतोच. या व्यक्तीचे वजन सामान्यतः १०० किलोच्या वर असते. संबंधित रुग्णाचे बीएमआय, त्याला असलेले आजार पाहून कोणती शस्त्रक्रिया करायचा याचा निर्णय घेतला जातो.

 ससून रुग्णालयात फेब्रुवारी २०२३ पासून १२ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.  एका ३६ वर्षीय महिलेला थायरॉईड आणि मधुमेह होता. ११५ किलो वजन असलेल्या ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकास उच्च रक्तदाब, मधुमेह, गुडघेदुखीचा त्रास होता. ज्यांचे वजन दीडशे किलोवर असेल त्यांच्यावर गॅस्ट्रिक बायपास सर्जरी केली जाते. इतरांवर लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी शस्त्रक्रिया करण्यात येते. स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमीमध्ये जठराचा काही भाग काढला जातो. रुग्णाच्या बीएमआयवरून किती भाग काढायचा हे ठरवले जाते.  गॅस्ट्रिक बायपासमध्ये जठराकडून आतड्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार केला जातो. या शस्त्रक्रियेमुळे फॅट कमी होऊन भूक मंदावते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. लठ्ठपणामुळे जाणवणारे इतर आजारही नियंत्रणात येतात. अशी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाचे समुपदेशन केले जाते, असे बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. अमेय ठाकूर म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story