शिवाजीनगर रेल्वेस्टेशन
राजानंद मोरे
rajanand.more@civicmirror.in
TWEET@Rajanandmirror
पुणे रेल्वे स्थानकातून दररोज ३५० हून अधिक रेल्वेगाड्या धावतात, तर दररोज दीड लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा होते. स्थानकाची सध्याची स्थिती आणि त्या तुलनेत असलेल्या सुविधा प्रवाशांसाठी अपुऱ्या पडतात. त्यामुळे दररोज तक्रारींचा पाऊस पडतो. आता या आठवडाभरात स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून येत्या प्रजासत्ताकदिनी (ता. २६ जानेवारी) शिवाजीनगर रेल्वे स्थानकातून जवळपास १० ते १५ लोकल गाड्या सोडण्याची तयारी करण्यात आल्याचे समजते.
शिवाजीनगर रेल्वे स्थानकात लोकलसाठी स्वतंत्र नवीन फलाट तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. रेल्वेकडून रविवारी (ता. २२) त्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. या दरम्यान फलाटावरील बहुतेक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आता पुढील दोन दिवसांत उर्वरित कामे पूर्ण करून येत्या २६ तारखेपासूनच लोकल गाड्या सोडण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. रेल्वेकडून याबाबत बुधवारी अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा दरम्यान दररोज ४० लोकल धावतात. त्यातून सुमारे ८० ते ९० हजार प्रवासी दररोज ये-जा करतात. पुण्यासह शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड भागातून अनेक विद्यार्थी, खासगी-शासकीय कामगार, व्यावसायिक लोकलने प्रवास करतात. एकीकडे लोकल गाड्या वाढविण्याचीही मागणी होती. पण रेल्वे स्थानकात अनेक एक्स्प्रेस गाड्यांनाही वेळेवर फलाट उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून पुणे स्थानकाला पर्याय म्हणून हडपसर, शिवाजीनगर व खडकी स्थानके विकसित केली जात आहेत.
रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकाचा भार कमी करण्यासाठीच शिवाजीनगर रेल्वे स्थानकात लोकलसाठी एक अतिरिक्त फलाट बनविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात केली होती. लाईन टाकण्याबरोबरच ओएचई लाईन उभी करण्यात आली आहे. तसेच, रेल्वे रूळ देखील टाकण्यात आला आहे. लोणावळा लोकलपैकी २० ते ३० टक्के लोकल शिवाजीनगर स्थानकातून सोडण्याचे नियोजन सुरू आहे. स्थानकातील फलाटाची लांबी वाढविण्यात आली असून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. लोकल गाड्यांना डबे कमी असल्याने या गाड्या स्थानकातून सोडणे शक्य होणार आहे. आता नेमक्या कोणत्या वेळेच्या लोकल शिवाजीनगरहून सोडायच्या याबाबत अंतिम निर्णय होईल. त्यानुसार दोन दिवसांत याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली जाऊ शकते. फलाटाची लांबी कमी असल्याने एक्स्प्रेस गाड्या या स्थानकातून सोडता येणार नाहीत.
दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकातील लोकल गाड्यांची संख्या कमी झाल्यानंतर स्थानकात येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना वेळेवर फलाट उपलब्ध करून देण्यातील काही अडचणी दूर होणार आहेत. अनेकदा लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी लोकल गाड्यांना मार्गातच थांबविले जाते. त्यामुळे शिवाजीनगरहून पुणे स्थानकात येण्यासाठी लोकलला २० ते २५ मिनिटे लागतात. त्याचा प्रवाशांनाही फटका बसतो. काही प्रवासी लोकलने पुणे स्थानकात येऊन तिथून पुढील मार्गाच्या गाड्या पकडतात. लोकलला विलंब झाल्यास त्यांना पुढची गाडी पकडण्यासाठी धावपळ करावी लागते. आता स्थानकात येणाऱ्या लोकल गाड्या कमी होणार असल्याने इतर गाड्यांना फलाट मिळणे शक्य होणार आहे.
शिवाजीनगर रेल्वे स्थानकातील अतिरिक्त फलाटाचे काम पूर्णत्वास आले आहे. एक-दोन दिवसांत कामे पूर्ण होतील. त्यानंतर या स्थानकातून काही लोकल गाड्या २६ जानेवारीपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. पण कामे पूर्ण झाल्यानंतरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.