सोसायटीच्या दारी (उलटी) गटारगंगा
प्रिन्स चौधरी
वाघोलीतील सोसायट्यांमध्ये मैलापाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने बसवण्यात आल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. चुकीच्या कामामुळे चेंबर्समधून सांडपाणी आणि घाण बाहेर येणे, सोसायटीच्या पार्किंगमध्ये घाण पाण्याचे डबके वारंवार तयार होणे, डासांचा उच्छाद वाढणे आणि त्यामुळे परिसरात रोगराई पसरणे अशा अनेक समस्यांचा त्रास ह्या उलट्या गटारगंगेमुळे येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येऊनही रहिवाशांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. वाघोलीतील बायफ रस्त्यावर सावन्ना नावाची मोठी रहिवासी वसाहत आहे. सुमारे ५०० सदनिकांच्या या सोसायटीचे अध्यक्ष विकास शिंदे यांनी सांगितले की, 'सावन्नाच्या आजूबाजूला साधारणतः ११ सोसायटी आहेत. ह्या सोसायटींमध्ये एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) नाहीत. आमच्या सोसायटीपासून थोड्या अंतरावर असलेल्या सोसायटीच्या आवारातून जी वाहिनी जाते, तिच्यात उद्यानाचे आणि शौचालयाचे पाणी सोडले जाते. ते आमच्या सोसायटीच्या आवारात येऊ लागल्याने आम्ही काही काळापूर्वी ती वाहिनी तोडली. त्यामुळे सोसायटीच्या बाहेर सांडपाण्याचं एक तळं निर्माण झालं. लोक त्यात कचरा टाकू लागले. ते तळं म्हणजे डासांच्या उत्पत्तीचे मोठे केंद्र झाले आहे. तळ्यातील दूषित पाणी बोअरवेलमध्ये झिरपते आणि त्यामुळे भूजल दूषित होते. तेच पाणी पुन्हा सोसायटीतील घरांमध्ये आल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. पावसाळ्यात प्रदूषित पाणी उलट्या दिशेने वाहात येते आणि पार्किंगच्या भागात दूषित पाण्याचा अक्षरशः पूर येतो. दूषित दुर्गंधीयुक्त पाणी वारंवार उपसावे लागते. जवळच असलेल्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनादेखील रोगराईला सामोरे जावे लागत आहे.' शिंदे यांनी पुढे सांगितले की, "सांडपाण्याच्या चुकीच्या नियोजनाबाबत आम्ही वेळोवेळी पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे (हवेली) गटविकास अधिकारी आणि आरोग्य विभागाकडे तक्रारी दाखल केल्या. मात्र, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. लोणीकंद पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावरही आम्ही ही गोष्ट घातली. मात्र, ही तुमची आपसातली बाब आहे, असे सांगून त्यांनीही हात वर केले." सोसायटीतील रहिवासी अमित वाघोलीकर यांनी सीविक मिररला सांगितले की, “आम्ही १० वर्षांपासून या डोकेदुखीचा सामना करत आहोत. मैला आणि सांडपाण्यामुळे जवळच्या शेतातील बोअरवेल आणि विहिरीदेखील दूषित झाल्या आहेत. डेंग्यूसह इतर आजारांची लागण रहिवाशांना वारंवार होत असते. पावसाळ्यात लिफ्टच्या खड्ड्यातही पाणी शिरते. तळघरातील पार्किंगमध्ये घाण पाण्याचा पूर येतो. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला दूषित पाण्यात डिझेल टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यामुळे बेडूक आणि इतर जलचरांनाही धोका निर्माण होईल, म्हणून तसे केले नाही. बिल्डरने पाईपलाईन बांधली, परंतु शेतकऱ्यांनी विहिरींमध्ये प्रक्रिया न केलेले पाणी कचरा टाकून अडवले. ते विहिरीचे दूषित पाणी आता टँकरला विकले जात आहे. बिल्डरने १२ फूट खोल खड्डा खोदला आहे, तिथे पाणी पाईपलाईनद्वारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात जमा होते आणि तेथून पुढे वाहते. या पाणीपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जातात.' राहुल वर्मा, हरिश्चंद्र पाल आणि आरंभम् सिंग यांनीदेखील 'सीविक मिरर'शी बोलताना अशाच प्रकारच्या समस्या मांडल्या. नगर रस्त्याचे प्रभाग अधिकारी नामदेव बजबळकर यांच्याशी याच समस्येवर बोलण्यासाठी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो होऊ शकला नाही.