पार्किंगच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ कर्मचारी गंभीर

सहकारनगर येथील एका गृहसंस्थेत अर्धवट काम झालेल्या हायड्रॉलिक कार पार्किंगच्या खड्ड्यात पडून एक ज्येष्ठ सफाई कर्मचारी जबर जखमी झाला. अपघाताची घटना घडल्यानंतर अग्निशमन विभागाने अवघ्या सात ते आठ मिनिटांत घटनास्थळी धाव घेत या ज्येष्ठ सफाई कर्मचाऱ्याची सुटका केल्याने त्याचे प्राण वाचले. तेथील नागरिकांच्या माहितीनुसार पार्किंगसाठी खोदलेला खड्डा पाच वर्षांपासून तशाच अर्धवट स्थितीत आहे. बिल्डरने अजून हे काम पूर्ण केलेले नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Sat, 24 Jun 2023
  • 12:25 am
पार्किंगच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ कर्मचारी गंभीर

पार्किंगच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ कर्मचारी गंभीर

अग्निशमनच्या जवानांनी खुर्ची, दोरीचा वापर करत गंभीर जखमीची केली सुटका; उपचारासाठी रुग्णालयात

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

सहकारनगर येथील एका गृहसंस्थेत अर्धवट काम झालेल्या हायड्रॉलिक कार पार्किंगच्या खड्ड्यात पडून एक ज्येष्ठ सफाई कर्मचारी जबर जखमी झाला. अपघाताची घटना घडल्यानंतर अग्निशमन विभागाने अवघ्या सात ते आठ मिनिटांत घटनास्थळी धाव घेत या ज्येष्ठ सफाई कर्मचाऱ्याची सुटका केल्याने त्याचे प्राण वाचले. तेथील नागरिकांच्या माहितीनुसार पार्किंगसाठी खोदलेला खड्डा पाच वर्षांपासून तशाच अर्धवट स्थितीत आहे. बिल्डरने अजून हे काम पूर्ण केलेले नाही.      

सहकारनगर भाग-२ मधील ज्ञानदीप सोसायटी येथे शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. तुकाराम देठे ( वय ६०, रा. चव्हाणनगर) असे जखमी झालेल्या ज्येष्ठ सफाई कर्माचाऱ्याचे नाव आहे. अग्निशमन दलाला एक सफाई कर्मचारी पंधरा फूट खोल खड्ड्यात पडले असल्याची वर्दी सकाळी साडेनऊच्या सुमारास मिळाली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने तिथे धाव घेतली. पार्किंगच्या खड्ड्यात पडल्याने एक नागरिक जबर जखमी झाला होता.

पार्किंगसाठी खोदलेल्या खड्ड्यात जखमी अवस्थेत देठे पडले होते. त्यांच्या हाताला आणि पायाला जबर जखम झाली होती. त्यांना हालचाल करणे अवघड जात होते. तसेच, हाता-पायातून रक्त येत होते. जवानांनी देठे यांना खुर्चीवर ठेवले. त्यानंतर खुर्चीला दोरी बांधून त्यांना खेचून वर काढले. दरम्यान १०८ क्रमांकावरून रुग्णवाहिका बोलावून घेतली होती. त्यातून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अग्निशमन दलातील वाहनचालक सागर देवकुळे, संदीप घडशी, जवान महेंद्र सकपाळ, शैलेश गोरे, आशिष जाधव, विजय वाघमारे यांच्या पथकाने अवघ्या पंधरा मिनिटांत देठे यांना बाहेर काढले.

‘सीविक मिरर’शी बोलताना जवान महेंद्र सकपाळ म्हणाले, ज्ञानदीप सोसायटीच्या आवारात हायड्रॉलिक कार पार्किंगसाठी खड्डा खोदला आहे. पार्किंगचे काम अपुऱ्या अवस्थेत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सफाई काम करताना देठे खाली पडले. त्यांचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला आहे. हाता-पायातून रक्त येत होते. त्यांना हालचाल करतानाही त्रास होत होता. स्थानिक रहिवासी म्हणाले, पार्किंगसाठीचा खड्डा पाच वर्षांपासून खुला आहे. बिल्डरने अजून काम केलेले नाही. खड्डा खुला असल्याने आम्ही आमच्या मुलांना खाली खेळायला सोडत नाही. इतरांचाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या घटनेने त्याचा धडा मिळालेला आहे. त्यामुळे हायड्रॉलिक लिफ्टचे काम पूर्ण होईपर्यंत, आपण त्यावर जाळी बसवून घ्यावी अशी सूचना सोसायटीतील रहिवाशांना केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story