SBI ATM looted : एसबीआयच्या एटीएमला 'सीसीटीव्ही' नाही; लुटले १३ लाख

शहरातील फडके हौद चौकात गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एटीएम सेंटरमधील मशीन चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातील तब्बल १३ लाख ३४ हजार रुपये लुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यातच तेथे सायरन, सुरक्षारक्षक अशी कोणतीच सुरक्षा नसल्याचेही उघडकीस आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Tue, 18 Jul 2023
  • 11:54 pm
एसबीआयच्या एटीएमला 'सीसीटीव्ही' नाही; लुटले १३ लाख

एसबीआयच्या एटीएमला 'सीसीटीव्ही' नाही; लुटले १३ लाख

फडके हौद चौकातील 'एसबीआय'च्या एटीएममधील प्रकार; सुरक्षारक्षकही नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

शहरातील फडके हौद चौकात गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एटीएम सेंटरमधील मशीन चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातील तब्बल १३ लाख ३४ हजार रुपये लुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यातच तेथे सायरन, सुरक्षारक्षक अशी कोणतीच सुरक्षा नसल्याचेही उघडकीस आले आहे. हा प्रकार स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये १० ते १५ जुलैच्या दरम्यान घडला. याबाबत बँकेच्या वतीने पल्लवी नामदेवराव हर्ले यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  

एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये १० जुलै रोजी पैसे भरण्यात आले होते. त्यानंतर १५ जुलै रोजी पुन्हा पैसे भरण्यास कर्मचारी आले, तेव्हा त्यांना एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने तोडून आतील सर्व रक्कम चोरून नेल्याचे लक्षात आले. त्या वेळी त्यांनी फरासखाना पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी परिसरात चौकशी केली. परंतु, कोणालाही याबाबत माहिती नव्हती. बँक अधिकार्‍यांनी शनिवार असल्याने किती पैसे चोरीला गेले, हे सांगता येत नसल्याचे कळविले. त्यानंतर त्यांनी सोमवारी व्यवहार तपासल्यावर चोरट्यांनी एटीएममधून तब्ब्ल १३ लाख ३४ हजार २०० रुपये चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे.

अधिक माहितीनुसार पल्लवी हर्ले (वय ४२) या स्टेट बँकेत डेप्युटी मॅनेजर म्हणुन काम कार्यरत आहेत. त्यांच्याकडे एटीएम संदर्भातही काम असते. १५ जुलै रोजी ई-मेल तपासत असताना त्यांना फडके हौद, रविवारपेठ येथील एटीएम सेंटरमध्ये चोरी झाल्याची माहिती मिळाली. बँकेचे चॅनेल मॅनेजर विनायक लखोटे यांना घेऊन त्यांनी खात्री केली आणि फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना याबाबत माहिती दिली. ते घटनास्थळी पाहायला गेल्यावर एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने तोडून आतील सर्व रक्कम चोरल्याचे लक्षात आले. 

एटीएम सेंटरमध्ये बाजूलाच गॅस सिलेंडर, गॅस कटर, पाईप, लोखंडी रॉड पडल्याचे आढळून आले. चोरी झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी मोबाईलमध्ये या प्रकाराचे चित्रीकरण केले. त्या वेळी एटीएममधून नक्की किती पैसे गेले, तसेच चोरी कधी झाली? याची माहिती नसल्याने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून मंगळवारी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १० जुलै रोजी रात्री ते १५ जुलै रोजी सकाळी ११. ४० वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी १३ लाख ३४ हजार २०० रुपयांची चोरी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय दंड विधानातील कलम ३८०, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी सांगितले. 

स्टेट बँक ऑफ इंडियाने २०२१ मध्‍ये एकूण २२ हजार शाखा आणि ५८ हजार ५०० एटीएम मशिनसह खूप मोठे नेटवर्क तयार आहे. ही भारतीय सरकारी बँक असून, तिच्या शाखा संपूर्ण भारत आणि इतर राष्ट्रांमध्येही आहेत. मात्र, फडके हौद चौकाजवळील घटनेने सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story