संशोधक विद्यार्थ्यांची प्रवेशापूर्वीच झाली लूट

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील संशोधन केंद्राने पीएच.डी प्रवेशाच्या मुलाखतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे, अशा सूचना महाविद्यालयाला दिल्या आहेत. मात्र, पीएच.डी प्रवेशाच्या मुलाखतीसाठी होणारा खर्च भागवण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांकडून हे शुल्क आकारण्यात आले होते, असा अजब खुलासा महाविद्यालयाने केला आहे.

अण्णासाहेब मगर महाविद्यालया

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने मुलाखतीसाठी वसूल केले प्रत्येकी एक हजार रुपये; संशोधन केंद्राची मान्यता रद्द करण्याची मागणी

राहुल शिंदे 

rahul.shinde@civicmirror.in

TWEET@rahulsmirror

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील संशोधन केंद्राने पीएच.डी प्रवेशाच्या मुलाखतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे, अशा सूचना महाविद्यालयाला दिल्या आहेत. मात्र, पीएच.डी प्रवेशाच्या मुलाखतीसाठी होणारा खर्च भागवण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांकडून हे शुल्क आकारण्यात आले होते, असा अजब खुलासा महाविद्यालयाने केला आहे.

पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये किंवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील संशोधन केंद्रांत पीएच.डी साठी प्रवेश मिळावा, यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्न करतात. संशोधन केंद्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या जागा आणि पीएच.डी प्रवेशासाठी अर्ज करणारे विद्यार्थी यांच्यात मोठी तफावत आहे. या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील संशोधन केंद्राने असे पैसे घेतल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाने पीएच. डी प्रवेशासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. नियम डावलून प्रवेश करणाऱ्या संशोधन केंद्राची मान्यता काढून घेतली जाईल, असे परिपत्रक यापूर्वीच विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे शुल्क आकारणाऱ्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील संशोधन केंद्राची मान्यता काढून घ्यावी, अशी मागणी विद्यापीठाकडे करण्यात आली आहे.

पीएच.डी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जातो. त्यासाठी विद्यार्थी विद्यापीठाकडे ऑनलाइन पद्धतीने शुल्क जमा करतात. त्यामुळे प्रवेश निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक प्रवेशाचे शुल्क घेणे अपेक्षित आहे. मात्र, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये पीएच.डी प्रवेशासाठी मुलाखत देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून एक हजार रुपये प्रवेश शुल्क घेतले. काही विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क जमा केल्याची पावतीसुद्धा दिली. परंतु अशाप्रकारे शुल्क आकारता येत नसल्याचे लक्षात आल्यावर तुकाराम जाधव या विद्यार्थ्याने विद्यापीठाकडे लेखी तक्रार केली. त्यावर विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने महाविद्यालयाकडे पत्रव्यवहार करून घडलेल्या प्रकाराचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

तुकाराम जाधव म्हणाला की, विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीत पीएच. डी प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारावे, असे कुठेही नमूद केलेले नाही. तरीही मुलाखतीसाठी आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात एक हजार रुपये शुल्क वसूल करण्यात आले. पीएच.डी प्रवेशात अडचणी निर्माण होऊ नये म्हणून निमूटपणे विद्यार्थ्यांनी हे शुल्क दिले. मात्र, शुल्क जमा केलेल्या विद्यार्थ्यांपैकी निवडक विद्यार्थ्यांनाच संबंधित महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रात प्रवेश मिळाला. परिणामी केवळ मुलाखत देण्यासाठी आपल्याकडूनच एक हजार रुपये शुल्क घेल्याचे विद्यार्थ्यांच्या उशिरा लक्षात आले. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना शुल्क म्हणून घेतलेले त्यांचे पैसे परत द्यावे व संबंधित महाविद्यालयाच्या संशोधन केंद्राची संलग्नता काढून घ्यावी, अशी मागणी  करण्यात आली आहे.

दरम्यान पीएच. डी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क विद्यापीठाकडून ऑनलाईन पद्धतीने जमा करून घेतले जाते. मात्र, विद्यापीठातर्फे महाविद्यालयांना त्यांच्या वाट्याची रक्कम दिली जात नाही. परिणामी प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या चहापानाचा खर्च भागवणे, विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणाऱ्या विषयतज्ज्ञांना मानधन देणे आदी कारणांसाठी अशा पद्धतीने शुल्क जमा केले जात असल्याचे बोलले जात आहे.

 

पीएच.डी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्याची तक्रार विद्यापीठाकडे प्राप्त झाली. त्यावर अण्णासाहेब मगर महाविद्यालयाकडून लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांकडून आकारलेले शुल्क त्यांना परत द्यावे, अशा तोंडी सूचना दिल्या आहेत.

- आर. एम. राहेरकर, उप-कुलसचिव, शैक्षणिक प्रवेश विभाग, 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

विद्यापीठाकडून महाविद्यालयाला विद्यार्थ्यांच्या शुल्काबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यावर पीएच. डी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी आलेल्या विषय तज्ज्ञांचा खर्च भागविण्यासाठी विद्यार्थ्यांकडून एक हजार रुपये शुल्क आकारण्यात आले, असा अहवाल विद्यापीठाकडे पाठविण्यात आला आहे.

- डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story