भाड्याच्या चारचाकींची थेट पाकिस्तान सीमेजवळ विक्री
नितीन गांगर्डे
nitin.gangarde@civicmirror.in
प्रवासाकरिता भाड्याने चारचाकी घेत त्यांची थेट पाकिस्तान सीमेजवळ विक्री करण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला असून या प्रकरणी एका संशयित आरोपीला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल साठ लाखांच्या तीन चारचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीचे दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
सुफियान चौहान (वय १९, रा. फतेगंज, गुजरात) असे मध्य प्रदेश येथे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'झुमकार' ही कंपनी मोबाईल ॲप्लिकेशनवरून चारचाकी भाड्याने देते. आरोपी चौहान हा विविध व्यक्तींची ओळखपत्रे अपलोड करीत गाड्या भाड्याने घेत त्यांची परराज्यात विक्री करतो. त्यानुसार खराडी येथील प्राची पठारे यांची वीस लाख रुपये किमतीची चारचाकी (एमएच १२ टीके २८४७ ) झूमकारवरून भाड्याने घेऊन आरोपी पळून गेल्याचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. आरोपीने हीच पद्धत वापरून वाघोली, विश्रांतवाडी येथूनही महागड्या चारचाकी भाड्याने घेत पुढे त्या पाकिस्तान सीमेजवळ राजस्थान येथे अवैध धंद्यासाठी विकल्या.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपी इंदौरला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक अरविंद कुमरे, कर्मचारी श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, विकास कदम, शेखर शिंदे, सचिन कुटे, सचिन रणदिवे, सुहास निगडे, अविनाश संकपाळ यांनी इंदोरला जाऊन आरोपीस ताब्यात घेतले.