भाकरी फिरवली; घाटेंना माळ, मुळीकांना नारळ
देवेंद्र शिरुरकर
devendra.shirurkar@civicmirror.in
आगामी पालिका आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्थानिक पातळीवर भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. बुधवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षांची खांदेपालट करण्यात आली आहे.
भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यात बदल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करून ७० नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या दृष्टिकोनातून भाजपची जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा कार्यकाळ संपल्याने भाजपकडून नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत धीरज घाटे हे इच्छुक उमेदवार होते. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. घाटे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेत घाटेंची समजूत काढली होती.
नवनिर्वाचित शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, गेली ३० ते ३२ वर्ष ज्या विचारधारेचे काम करत आहे. त्याच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याने खूप आनंद होत आहे. सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता पुढील वर्षात होऊ घातलेल्या महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि आम्ही तिघेजण मिळून मोठ्या ताकदीने लढणार आहोत. येणाऱ्या काळात पक्ष वाढीसाठी काम करणार आहे," असेही त्यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.