पावसाळी, मैलापाणीवाहिनी एकत्र; नालेसफाई कागदावरच

महानगरपालिकेने पावसाळी वाहिन्यांपासून दोन फूट अंतरावर ड्रेनेज लाईन टाकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामध्ये मातीचे थर आढळून आले आहेत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून त्याची सफाई झाली नसल्याचे समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Tue, 20 Jun 2023
  • 11:44 pm
पावसाळी, मैलापाणीवािहनी एकत्र; नालेसफाई कागदावरच

पावसाळी, मैलापाणीवािहनी एकत्र; नालेसफाई कागदावरच

हिराबाग ते राष्ट्रभूषण चौक रस्त्याच्या कामादरम्यान धक्कादायक बाब उघडकीस; नागरिकांच्या जिवाशी खेळ

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

महानगरपालिकेने पावसाळी वाहिन्यांपासून दोन फूट अंतरावर ड्रेनेज लाईन टाकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामध्ये मातीचे थर आढळून आले आहेत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून त्याची सफाई झाली नसल्याचे समोर आले आहे. नियमित ड्रेनेज सफाई होत असल्याचा दावा पालिका प्रशासन करत असले, तरी तो खोटा असल्याचे स्पष्ट होत आहे. हिराबाग ते राष्ट्रभूषण चौक येथील रस्त्याचे काम चालले असताना हा प्रकार उघडकीस आला असल्याचे ऋषीकेश आबा बालगुडे  यांनी सांगितले.

राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग येथील रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुरावस्था असल्याने त्याचे नव्याने डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्याच्या खोदकामामध्ये पालिकेचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. येथे  खोदकाम केल्यावर काही भागात ड्रेनेज लाईन आणि पावसाळी लाईन साधारणतः दोन फूट अंतरावर टाकण्यात आली आहे. येथील ड्रेनेज आणि पावसाळी लाईनचे काम मागील तीन वर्षांपूर्वी पालिकेकडून करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने काम व्यवस्थित केले नाही. येथील रस्त्याचा काही भाग वारंवार खचत असल्याने रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यास सुरुवात झाली. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. मीटरने मोजमाप केल्यावर दोन फूट अंतरावर पावसाळी पाण्याची लाईन असल्याचे निदर्शनास आले आहे. ती नियमानुसार पाच फूट खोल असायला पाहिजे असेही बालगुडे यांनी सांगितले.

ड्रेनेजची स्वच्छता कित्येक दिवसांपासून करण्यात आली नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामध्ये मातीचे थरच्या थर साचले आहेत. यावरून तिची मागील कित्येक दिवसांपासून सफाईच झाली नसल्याचे लक्षात येत आहे. मात्र, महानगरपालिका नियमित सफाईचा दावा करत आहे. तो आज फोल ठरला आणि पालिका प्रशासनाचे खोटे दावे उघडकीस आले आहे. याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाहणी करण्यासाठी बोलावले असतात त्यांनी येथील परिस्थिती पाहिली. याबाबतीत सर्व काम आहे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून दुरुस्त करण्याचे आश्वासन त्यांनी बालगुडे यांना दिले आहे. मात्र, आता पावसाळा असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर त्याचे काम करता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाळ्यानंतर मात्र  ताबडतोब केले जाणार असल्याचे सांगितले.

हिराबाग ते राष्ट्रभूषण चौकापर्यंत रस्त्याचे काम चालले आहे. आता येथे रस्त्याचे काम झाल्यावर पुन्हा पावसाळी लाईनच्या कामासाठी खोदकाम करावे लागणार आहे. आता रस्त्याचे काम केले नाही, तर पावसाळ्यामध्ये रस्त्याची खूपच दुरवस्था होईल. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे असा दुहेरी पेच निर्माण झाला आहे. पावसाळ्यात चिखल होईल, नागरिकांना येण्या-जाण्यासाठी कठीण होईल, असे बालगुडे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story