illegal firecracker factory pune : अवैध फटाका कारखान्यावर छापा

बेकायदेशीरपणे फटाके बनवणाऱ्या कारखान्यावर चिखली पोलिसांनी छापा घालून १ लाख ५०० रुपयांची घातक स्फोटके जप्त केली आहेत. या प्रकरणी कारखाना चालवणाऱ्या दोघांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान आणि भारतीय विस्फोटक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 31 Jul 2023
  • 01:25 am
अवैध फटाका कारखान्यावर छापा

अवैध फटाका कारखान्यावर छापा

बंदी असलेली रसायने वापरली जात असल्याचा संशय, १०० किलो वजनाचे स्फोटक जप्त, चिखली पोलिसांची कारवाई

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

बेकायदेशीरपणे फटाके बनवणाऱ्या कारखान्यावर चिखली पोलिसांनी छापा घालून १ लाख ५०० रुपयांची घातक स्फोटके जप्त केली आहेत. या प्रकरणी कारखाना चालवणाऱ्या दोघांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान आणि भारतीय विस्फोटक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. विक्रांत राज देशमुख आणि संतोष टायप्‍पा शिवशरण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

शहरात १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर चिखलीत फटाके बनवण्याच्या अवैध कारखान्यात स्फोटक रसायन असल्याचे आढळून आले आहे. वरकरणी हा फक्त फटाके बनवण्याचा कारखाना वाटत असला तरी त्यासाठी आवश्यक असणारे परवाने घेण्यात आले नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे हा भयंकर प्रकार असल्याचे चिखली पोलिसांनी सांगितले. येथून स्फोटक रसायन चोरीला गेले तर हा कारखाना अवैध  असल्याने त्याबाबत पोलिसांत तक्रारही ते करू शकत नाहीत. त्यामुळे येथील रसायनाचा वापर समाजविघातक, देशविघातक कृत्यांसाठी केला जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. एकूणच या प्रकारचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने त्यावर कारवाई केली आहे.

शनिवारी (२९ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास चिखली पोलीस गस्तीवर असताना त्यांना चिखलीतील सोनवणे वस्ती येथे एक संशयास्पद कारखाना असल्याचे लक्षात आले. संशय बळावल्याने त्यांनी कारखान्यात जाऊन विचारपूस केली असता फटाके बनवणाऱ्या आरोपीने पोलिसांना सांगितले की, माझे फटाक्यांचे दुकान आहे त्यामुळे आम्ही स्वतःच येथे फटाके बनवत आहोत. पोलिसांनी तेथील विध्वंसक साहित्य जप्त केले आहे. त्यात ५ हजार रुपये किमतीचे रेड फॉस्फरस असलेले पत्र्याचे दोन डबे, ॲल्युमिनियम पावडर असलेला २५ हजार रुपये किमतीचा पत्र्याचा एक डबा आणि एक फोडलेली गोणी, ५०० रुपये किमतीची एक सल्फरची पिशवी, ५० हजार रुपये किमतीचे पोटॅशियम नायट्रेटचे सहा प्लस्टिकचे डबे आणि दोन गोण्या, १० हजार रुपये किंमत असलेले गन पावडरचे चार डबे आणि १० हजार रुपये किमतीची अग्निशमन यंत्रे या स्फोटक वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. चिखली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काटकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे, पोलीस हवालदार चंद्रशेखर चोरघे, नांगरे, होले, तारळकर यांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून लोकांच्या जीवनात धोका निर्माण होईल अशा परिस्थितीमध्ये फटाके बनवण्यासाठी लागणारी स्फोटके बाळगली. यासाठी आरोपींनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. याची माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ५०० रुपये किमतीचे स्फोटके आणि केमिकल जप्त केले आहे. विक्रांत राज देशमुख (वय ३६, रा. कसबा पेठ, पुणे) आणि  संतोष टायप्‍पा शिवशरण (वय ४४, रा. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलीस हवालदार चंद्रशेखर चोरगे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम २८५, ३३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story