रेल्वेने दंड करूनही ठेकेदाराची मुजोरी

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील पार्किंग ठेकेदाराला मागील आठवड्यातच ३० हजार रुपयांचा दंड करण्यात आला होता. तरीही पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती झाली आहे. पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांना पावती न देणे, जादा शुल्क वसुली करण्याचा ठपका ठेकेदारावर ठेवण्यात आला होता. पण दंड करूनही पुन्हा जैसे थे स्थिती असल्याचे आढळून आले आहे. वाहनचालकांना पावती न देताच त्यांच्याकडूनही शुल्क वसुली सुरू आहे. 'सीविक मिरर'ने रविवारी (ता.२९) केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली.

पुणे रेल्वे स्टेशन पार्किंग

पुणे स्थानकातील प्रकार; पार्किंगमध्ये वाहनचालकांकडून जादा शुल्काची वसुली सुरूच

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील पार्किंग ठेकेदाराला मागील आठवड्यातच ३० हजार रुपयांचा दंड करण्यात आला होता. तरीही पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती झाली आहे. पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांना पावती न देणे, जादा शुल्क वसुली करण्याचा ठपका ठेकेदारावर ठेवण्यात आला होता. पण दंड करूनही पुन्हा जैसे थे स्थिती असल्याचे आढळून आले आहे. वाहनचालकांना पावती न देताच त्यांच्याकडूनही शुल्क वसुली सुरू आहे. 'सीविक मिरर'ने रविवारी (ता.२९) केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली.

लेखिका व केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीच्या सदस्य शेफाली वैद्य यांना मागील आठवड्यात पुणे स्थानकातील पार्किंगबाबत तक्रार केली होती. त्यांच्या चालकाने त्यांचे वाहन केवळ पाच ते सहा मिनिटांसाठी पार्किंगमध्ये उभे केले होते. त्यावेळी पार्किंग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना कुठलीही पावती दिली नव्हती. शेफाली वैद्य आल्यानंतर त्या गाडीत बसून पार्किंगमधून बाहेर पडू लागल्या. त्यावेळी त्यांच्यासमोर आठ-दहा गाड्या होत्या. त्यातील कोणालाही पावती देण्यात आलेली नव्हती. प्रत्येकाकडून ४० रुपये घेतले जात होते. वैद्य यांनाही ४० रुपये मागितले. ते त्यांनी दिले पण त्याची पावती मागितली. कर्मचाऱ्याने पावती दिली खरी परंतु ती पावती दुचाकीची होती. तसेच त्यावर शुल्काचा उल्लेखही नव्हता.

वैद्य यांनी ही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून उजेडात आणल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून तातडीने त्याची दखल घेत ठेकेदाराला कार्यालयात बोलवून घेण्यात आले होते. वैद्य यांच्या तक्रारीवरून त्याला ३० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तसेच पार्किंगमध्ये आलेल्या प्रत्येक गाडीला पावती देण्यास बजावण्यात आले होते. यानंतरही पार्किंमधील लूट थांबलेली नाही. रेल्वेने केलेल्या कारवाईनंतर याबाबत आमच्या प्रतिनिधीने रविवारी पाहणी केली. त्यावेळी ठेकेदाराकडून नव्याने कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे आढळले आहे.

पार्किंगमध्ये येणाऱ्या चारचाकी गाड्या उभ्या करून चालक निघून जात होते. त्यावेळी त्यांना पावती दिली जात नव्हती. पार्किंगमध्ये गाडी आल्यानंतर लगेच त्यांना पावती देणे अपेक्षित आहे. त्या पावतीवर नियमानुसार वेळेप्रमाणे शुल्क आकारणीचाही उल्लेख हवा. पार्किंगमधील गाडी बाहेर नेताना ही पावती दाखवून प्रत्येक गाडी किती वेळ उभी होती, त्यानुसार शुल्क आकारणी करणे अपेक्षित आहे. परंतु, सुरूवातीपासूनच ठेकेदाराकडून या नियमांचे पालन केले जात नाही. दुचाकी पार्किंगमध्ये मात्र आधी पावती दिली जाते. कारवाई केल्यानंतर तरी स्थिती सुधारेल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना होती. तक्रारी करूनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पार्किंग ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांची बेकायदा वसुली सुरूच आहे.

शिवाजीनगर स्थानकात वाहनचालकांची लूट  

शिवाजीनगर येथील रेल्वे स्थानकाच्या आवारातील पार्किंगमध्येही नागरिकांची लूट सुरू आहे. नो पार्किंगमधील वाहनांकडूनही ठेकेदाराकडून पार्किंगचे शुल्क वसूल केले जात आहे. पार्किंगच्या बाहेरील जागेत नो पार्किंगचा फलक आहे. त्यावरच ठेकेदाराकडून पार्किंगच्या दराला फलक लावला आहे. त्या फलकाच्या परिसरात उभ्या राहणाऱ्या प्रत्येक वाहनाकडून शुल्क घेतले जाते. शुल्क घेतल्यानंतर त्याची पावती दिली जाते परंतु, ती पावती ठेकेदाराकडून परत घेतली जाते. याबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पार्किंग ठेकेदारावर नुकतीच दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नियमानुसार ठेकेदाराने प्रत्येक वाहनाला पावती देणे अपेक्षित आहे. कारवाईवेळीही हे पुन्हा सांगण्यात आले आहे. त्यानंतरही ठेकेदाराकडून पूर्वीप्रमाणेच पावती दिली जात नसेल तर त्याबाबत माहिती घेण्यात येईल. त्यानुसार कार्यवाही केली जाईल.

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story