Yerawada Central Jail: ‘बुद्धिबळामुळे कैदी तणावमुक्तीकडे’

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (फिडे) व इंडियन ऑईलच्या एकत्रित प्रयत्नाने नुकतेच येरवडा मध्यवर्ती कारागृहात द्वितीय ‘चेस फॉर फ्रीडम’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले गेले. बुद्धिबळामुळे कैदी तणावमुक्त होत असून आयुष्याकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन त्यांना मिळत आहे.

Yerawada Central Jail

बुद्धिबळामुळे कैदी तणावमुक्तीकडे

आयुष्याकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन मिळाला, राज्यातील तुरुंगात दोनशे कैदी खेळतात बुद्धिबळ ; सहभागामुळे शिक्षेत सूट

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (फिडे) व इंडियन ऑईलच्या एकत्रित प्रयत्नाने नुकतेच येरवडा मध्यवर्ती कारागृहात द्वितीय ‘चेस फॉर फ्रीडम’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले गेले. बुद्धिबळामुळे कैदी तणावमुक्त होत असून आयुष्याकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन त्यांना मिळत आहे. यासह वेळेचा सदुपयोग करीत असल्याची भावना येरवडा मध्यवर्ती कारागृहातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेची तयारी करीत असलेल्या कैद्यांनी व्यक्त केली.

‘परिवर्तन प्रीझन टू प्राईड-नई दिशा’ या उपक्रमांतर्गत येरवडा कारागृहाच्या बंदिवानांच्या संघाने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. त्यामुळे कारागृहातील बंदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पुढे येत आहेत. सुवर्णपदक प्राप्त कैद्यांना शिक्षेत विशेष माफी देऊन प्रोत्साहन देण्यात आले आहे. या वर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विविध देशांतील तुरुंगातील कैद्यांची स्पर्धा आयोजित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.

यावेळी महिला कारागृहातील कैदी शर्मिला म्हणाल्या, ‘‘ कारागृहात आल्यानंतर सतत खटल्याचा विचार येत होता. बुद्धिबळाच्या खेळामुळे वेळेचा सदुपयोग झाला. विचार करण्याची पद्धत बदलली. या खेळातून एक चुकीची चाल केल्यास खेळ संपतो, हेच तत्त्व जीवनाचे असल्याचे कळाले.’’

महिला खुल्या कारागृहातील वंदना म्हणाल्या, ‘‘ बुद्धिबळ खेळाविषयी ऐकले होते. पहिल्यांदा खेळ कारागृहात खेळले. त्यामुळे मानसिक तणाव कमी झाला. यामुळे विचार करण्याची दिशा बदलली. खुल्या कारागृहात काम करून दररोज वेळ काढून एक ते दोन तास बुद्धिबळाचा सराव करीत असते.’’

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील समिर म्हणाला, ‘‘ कारागृहात असताना सतत मानसिक तणावाखाली असायचो. कुटुंबीयांचा विचार येत होता. आर्थिक परिस्थितीमुळे मानसिक आजार बळावला होता. बुद्धिबळामुळे मनाला नैसर्गिक आराम मिळाला आहे. बुद्धी ताजीतवानी झाली आहे. दिनचर्या पूर्णत: बदलून गेली आहे. जीवनाकडे सकारात्मक पाहण्याचा दृष्टिकोन मिळाला आहे.’’

कारागृहातील विविध उपक्रमांमुळे बंदीवानांमध्ये चांगला बदल घडत आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर कौशल्याच्या माध्यमातून समाजामध्ये आत्मसन्मानाने जगू शकू, असा आत्मविश्वासही निर्माण होऊ शकणार आहे. ‘सुधारणा व पुनर्वसन’च्या माध्यमातून कैद्यांना व्यावसायिक कौशल्याने सक्षम केल्याचे उपकारागृह महानिरीक्षक स्वाती साठे यांनी ‘सीविक मिरर’ ला सांगितले.

राज्यातील सर्व कारागृहातील कैद्यांना बुद्धिबळ खेळण्याची सोय करण्यात येणार आहे. या खेळामुळे त्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून आला आहे. सध्या कारागृहातील दोनशे कैदी बुद्धिबळ खेळत आहेत. या कैद्यांच्या शिक्षेत विशेष सवलत देण्यात येणार आहे.

- अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest