पुणे: व्यसनमुक्तांच्या मदतीने पोलीस करणार प्रबोधन; शाळा, महाविद्यालये, आयटी कंपन्या, बीपीओमध्ये जगजागृती करणार

शहरात वाढत असलेली अमली पदार्थ तस्करी आणि सेवन यावर नियंत्रण आणण्याकरिता कायदेशीर कारवाईसोबतच पोलीस प्रबोधनदेखील करणार आहेत.

संग्रहित छायाचित्र

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांची माहिती

शहरात वाढत असलेली अमली पदार्थ तस्करी आणि सेवन यावर नियंत्रण आणण्याकरिता कायदेशीर कारवाईसोबतच पोलीस प्रबोधनदेखील करणार आहेत.

मुक्तांगण संस्थेसह सुमारे ४५ संस्थांच्या (एनजीओ) मदतीने शाळा, महाविद्यालये, आयटी कंपन्या, बीपीओमध्ये समुपदेशन केले जाणार आहे. यासोबतच पालकांनादेखील यामध्ये सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

शाळा स्तरावर तसेच महाविद्यालय स्तरावर शिक्षकांना पोलीस आणि एनजीओच्या माध्यमातून प्रशिक्षित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांवर कशाप्रकारे लक्ष ठेवायचे? त्यांच्या दप्तरांची कशाप्रकारे तपासणी करावी, याची माहिती दिली जाणार आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या दप्तरात ब्लेड, व्हाईटनर, आयोडेक्स आदी पदार्थ आढळून येतात. कोणाच्याही लक्षात न येणाऱ्या पद्धतीने विद्यार्थी व्यसन करतात. त्यावरदेखील लक्ष ठेवण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासोबतच विविध महाविद्यालयांच्या आवारातदेखील जनजागृती केली जाणार आहे. महाविद्यालयाचे आवार, त्याच्या आसपासच्या परिसरातदेखील पोलिसांकडून समुपदेशन केले जाणार आहे.

शाळा आणि महाविद्यालये या ठिकाणी कारवाई करण्यासोबतच देखरेखदेखील ठेवली जाणार आहे. यासोबतच बीपीओ, कॉल सेंटर, आयटी कंपन्यांमध्येदेखील समुपदेशन केले जाणार आहे. या जनजागृतीसाठी व्यसनमुक्त झालेल्या तरुण, प्रौढ अशा व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्या स्वानुभवातून या क्षेत्रात काम करणाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. समुपदेशन करताना व्यसनमुक्तीसंदर्भात सादरीकरण केले जाणार आहे. या जनजागृती आणि प्रबोधनासाठी ४५ एनजीओंची मदत घेतली जाणार आहे.

जे अल्पवयीन गुन्हेगार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत आहेत त्यामागे अमली पदार्थांचे सेवन हेदेखील मोठे कारण असल्याचे अतिरिक्त आयुक्त बलकवडे यांनी सांगितले. गुन्हेगारी संदर्भात पोलिसांनी काही हॉटस्पॉट निश्चित केले आहेत. या ठिकाणी एनजीओचे कार्यकर्ते पोलिसांच्या मदतीने प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर उतरून काम करणार आहेत. अल्पवयीन मुलांच्या पालकांचेही प्रबोधन केले जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रासह शिक्षणापासून दूर असलेल्या वर्गातदेखील जनजागृती केली जाणार असल्याची माहिती बलकवडे यांनी दिली.

चालू वर्षातील कारवाई

पदार्थ गुन्हे आरोपी वजन मूल्य
गांजा १९ २७ ११० किलो ५१ लाख २९ हजार
कॅनाबिस वनस्पती -- २ लाख ३० हजार
कोकेन १८९ ग्रॅम ५७ लाख २८ हजार ८००
मॅथ्यूक्यूलॉन १५ ग्रॅम ३ लाख २० हजार
मेफेड्रोन १९ ३४ -- ३,६७५ कोटी
अफीम १,२४० ग्रॅम २५ लाख
पॉपीड्रॉ ४,६०० ग्रॅम ८३ हजार

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest