पुणे: ड्रग्जविरोधात काॅलेजमध्ये जागृती, प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशकाचे पद; उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

अमली पदार्थांच्या व्यसनापासून युवकांनी दूर राहावे, यासाठी प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशकाचे एक अतिरिक्त पद (किमान व्हिजिटिंग) निर्माण करण्याचा शासन गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. २६) दिली.

ड्रग्जविरोधात काॅलेजमध्ये जागृती

अमली पदार्थांच्या व्यसनापासून युवकांनी दूर राहावे, यासाठी प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशकाचे एक अतिरिक्त पद (किमान व्हिजिटिंग) निर्माण करण्याचा शासन गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. २६) दिली.

जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनने कार्टून्स कंबाईनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात पाटील बोलत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहरातील प्रथितयश व्यंगचित्रकारांनी 'पुणेकरांनो, एकत्र येऊन अमली पर्दार्थांच्या विरोधात लढू या' असा संदेश देणारी व्यंगचित्रे काढली.

यावेळी पाटील म्हणाले, ‘‘अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. परंतु ७० लाख लोकसंख्येचे शहर हे जवळजवळ कामातून गेले, अशी प्रतिमा निर्माण होत आहे. जगाचा पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. येथे उद्योगांची संख्या मोठी असून, आरोग्य सेवा उत्तम आहे. वेगाने विकसित होणारे देशातील आठव्या क्रमांकाचे शहर ही प्रतिमा व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेले  शहर अशी चुकीची होत आहे. हे थांबवण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. नागरिकांना दक्षता पथकांमध्ये सहभागी करून घेतले पाहिजे. पबसंदर्भात नियमावली करून अंमलबजावणीसाठी पुणेकरांनी एकत्र आले पाहिजे. या विषयात कोणीही विषयात राजकारण करू नये.’’

चारूहास पंडित, योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी, अतुल पुरंदरे, धनराज गरड, शरयू फरकांडे, लहू काळे, अश्विनी राणे या व्यंगचित्रकारांनी सहभाग घेतला.

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवा...

पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.

पुणे शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी  पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना हे निर्देश दिले. पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावे, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest