Pune : पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपच्या जाहिरातीला विलंब का?
तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर पीएचडी संशोधन पूर्ण केलेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाकडून पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपशी संबंधित एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. तब्बल तीन वर्षांनी ही जाहिरात का काढली, वयोमर्यादा ओलांडलेल्यांना संधी दिली जाणार का, असे विविध प्रश्न संतप्त पीएचडी संशोधकांकडून केले जात आहेत. (post-doctoral fellowship)
पीएचडी संशोधक आणि विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तक्रारी दाखल केल्या आहेत. अचानक ही जाहिरात आल्यावर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होत नसल्यामुळे बहुतांश इच्छुकांचे अर्ज भरून झाले नाहीत. तसेच गेल्या तीन वर्षांपासून फेलोशिपच्या संबंधित जाहिरात विद्यापीठ प्रशासनाने काढली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे ते अपात्र ठरले आहेत. या अनुषंगाने पीएचडी संशोधकांचे काही आक्षेप आहेत. त्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्या, अन्यथा आंदोलन करू असा इशारा पीएचडी संशोधकांकडून देण्यात आला आहे.
दरवर्षी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, याची विद्यापीठ प्रशासनाने खात्री द्यावी. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल.’’ विद्यापीठ प्रशासनाने चार वर्षे जाहिरात प्रसिद्ध केली नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, याला सर्वस्वी जबाबदार हे विद्यापीठ प्रशासन आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद यासाठी केली जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र जाहिरात प्रसिद्ध केली गेली नाही. मग हा पैसा गेला कुठे, असा सवालदेखील राहुल ससाणे यांनी उपस्थित केला.
पीएचडी संशोधक संभाजी पटाईत म्हणाले, ‘‘मी मराठा प्रवर्गातील विद्यार्थी आहे. दरवर्षी वेळेवर नियमित जाहिरात न आल्यामुळे अनेक मराठा संशोधक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अनेक विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने नियमितपणे दरवर्षी जाहिरात प्रसिद्ध केली पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही. बाहेरील विद्यापीठांमध्ये अशा पद्धतीने वयाची कुठलीही मर्यादा नाही.’’
नाव न छापण्याच्या अटीवर इच्छुक विद्यार्थी म्हणाले, ‘‘शैक्षणिक वर्ष २०२०-२१ नंतर तब्बल चार वर्षांनी पोस्ट डॉक्टरेल फेलोशिपची जाहिरात विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे. २०२०-२१ नंतर जे विद्यार्थी अर्ज करण्यासाठी वयाची अट काठावर पूर्ण करत होते ते आज अपात्र ठरत आहेत. विद्यापीठाने पोस्ट डॉक्टरेल फेलोशिपच्या २०२४-२५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत उमेदवारांची संख्या प्रत्येक शैक्षणिक विभागासाठी आठ इतकी करावी तसेच अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थीहित विचारात घेऊन किमान या जाहिरातीपुरते तरी खुल्या आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वयाची अट ४० वर्षांपर्यंत शिथिल करावी.’’
विद्यापीठातील अध्यापक पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र वयाच्या अटीमुळे व परवानगीबाबत स्पष्टता नसल्यामुळे इच्छुक अध्यापक सदर संधीपासून वंचित राहात आहेत. विद्यापीठ प्रशासनाने वयाची अट कमी केल्यास व अध्यापकांना परवानगीबाबत स्पष्टता केल्यास इच्छुक अध्यापकांना संशोधनाची संधी निर्माण होऊ शकेल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. रवींद्र मेढे यांनी सुचवले.
या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ‘सीविक मिरर’ने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळक तसेच कुलसचिव ज्योती भाकरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
पीएचडी संशोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न
१) ही जाहिरात किती वर्षांनंतर प्रसिद्ध करण्यात आली आहे?
२) मध्यंतरी जाहिरात न काढण्याची कारणे कोणती ?
३) दरवर्षीच्या बजेटमध्ये किती कोटी रुपयांचा निधी यासाठी वर्ग केला जात होता ?
४) त्याचा प्रत्यक्षात वापर झाला की नाही?
५) दरवर्षी वेळेवर जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने जे विद्यार्थी वाढलेल्या वयामुळे अपात्र झाले त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक नुकसानीस जबाबदार कोण ?
६) कुणाचे प्रवेश कसे झाले ? कुणाच्या शिफारशीने झाले?
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.