Pune International Airport : पुणे विमानतळाला ‘जगद़्गुरु संत तुकाराम महाराज’ यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर

पुण्यातील लोहगाव विमानतळाला 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज' यांचे नाव देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आणि विमानतळाच्या नावात बदल करण्यासाठी हा ठराव आता केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे विमानतळाचे नाव बदलण्यात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 21 Dec 2024
  • 01:12 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील लोहगाव विमानतळाला 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज' यांचे  नाव देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आणि विमानतळाच्या नावात बदल करण्यासाठी  हा ठराव आता केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे विमानतळाचे नाव बदलण्यात येणार आहे. 

विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ११० अन्वये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा ठराव मांडला होता. तो विधानसभेने मंजूर केला. पुणे विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने याआधी मंजूर केला होता.   

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यानंतर आता विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. केंद्राची मंजूरी मिळाल्यानंतरच विमानतळाचे नवे नाव भारताच्या राजपत्रात अधिकृतरीत्या अधिसूचित केले जाईल. 

संत तुकाराम हे महाराष्ट्रातील मोठे संत तसेच आध्यात्मिक कवी होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. लोहगाव हे संत तुकाराम यांचे आजोळ होते. 

याविषयी माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचे आभार मानले आहे.

मुरलीधर  मोहोळ यांची एक्स वरील पोस्ट: 
"पाठपुराव्याला यश; पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासाठी आणखी एक पाऊल ! ‘जगद़्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ या नावासाठीचा पुनर्नामकरण प्रस्ताव महाराष्ट्र विधीमंडळात मंजूर करण्यात आला असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक धन्यवाद!"

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest