मानवधर्म हाच विश्वाचा धर्म

हिंदू धर्म हा शाश्वत धर्म असून, या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य सेवाधर्माचे पालन करतात, हा सेवाधर्म म्हणजेच मानवधर्म आहे आणि मानवधर्म हाच विश्वाचा धर्म असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 20 Dec 2024
  • 05:00 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन; प्रसिद्धीपासून दूर राहून सेवाकार्य करण्याचे आवाहन

हिंदू धर्म हा शाश्वत धर्म असून, या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य सेवाधर्माचे पालन करतात, हा सेवाधर्म म्हणजेच मानवधर्म आहे आणि मानवधर्म हाच विश्वाचा धर्म असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळीच्या महाविद्यालयाच्या मैदानात हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २२ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू आहे.

हिंदू संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवाकार्याची माहिती सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक देवस्थाने, सामाजिक, धार्मिक संस्था, मठ मंदिरांच्या सेवाकार्याचा त्यात सहभाग आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वामी गोविंददेवगिरी महाराज, ज्योतिष तज्ज्ञ लाभेश मुनीजी महाराज, इस्कॉनचे गौरांग प्रभू, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. एस. के जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भागवत पुढे म्हणाले की, सेवा करताना प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा आपला स्वभाव असतो. दिखाव्यासाठी सेवा न करता ती निरंतर करत राहणारे सेवेची कामना करतात. सेवेचा धर्म सांभाळताना अतिवादी न होता त्याचा मध्यम मार्ग आपण देशकाल परिस्थितीनुसार स्वीकारायला हवा. मानव धर्म हाच विश्वाचा धर्म असून तो सेवेतून प्रकट व्हावा. आपण विश्वशांतीसाठी घोषणा देतो मात्र अल्पसंख्याकांची काय अवस्था इतरत्र आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तीन हजार वर्षापेक्षा अधिक परंपरा असलेले शस्त्र, वाचन, इतिहास, स्वभाव आपले आहे. ते पाहणे आणि अंगीकारणे, पुढील पिढ्यांना त्यातून प्रेरणा देणे यासाठी असे हिंदू सेवा महोत्सवासारखे उपक्रम आहेत. पोट भरण्यासाठी आवश्यक ते केलेच पाहिजे पण गृहस्थाश्रमापलीकडे आपण जे जे मिळाले आहे ते सेवा रूपाने दुप्पट द्यायला हवे. जग आपले प्रतिपालक आहे. उपभोगाची वस्तू नाही ही भावना असेल तर परिवार समाज, गाव देश, राष्ट्र यांची मुक्त सेवा करण्याची प्रेरणा आणि अनुकरण आपण करावे. यासाठी अशा महोत्सवातून सेवाव्रत घेऊन चालूया असा संदेशही त्यांनी दिला.

घटेंगे तो कटेंगे

हिंदू या शब्दाशी तडजोड होता कामा नये. हा एकच शब्द तारणारा आहे. आजवर सेवा करून त्याची कधी जाहिरात केली नाही. मात्र आजचा काळ वेगळा आहे. आपले काम एकत्रितपणे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. जातीपातींतून बाहेर येऊन हिंदू म्हणून देशाची सेवा केली पाहिजे. बटेंगे तो कटेंगे ते कळते, तसेच घटेंगे तो कटेंगे हेही लक्षात घेण्याची गरज आहे. देशाला समर्थ करण्यासाठी हिंदूंना समर्थ व्हावे लागेल, असे गोविंददेव गिरी म्हणाले.

Share this story

Latest