संग्रहित छायाचित्र
पुणे : सरकारी अधिकाऱ्यांपैकी जवळपास ५० टक्के सरकारी अधिकारी केवळ नेहमीचे काम करतात. ते थोडे जास्तीचे काम करून नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांना नेतृत्त्व प्रशिक्षण दिले जाते. मात्र, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये नेतृत्त्वाचे गुण तितकेसे विकसित होत नाही. महिला सक्षम नेतृत्त्व करू शकतात. कठीण, गुप्त कामगिरी पार पाडू शकतात, असे मत माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केले.
पुणे पुस्तक महोत्सवातील पुणे साहित्य महोत्सवाअंतर्गत ‘वूमन, खाकी अँड लीडरशीप’ या विषयावरील चर्चासत्र झाले. त्यावेळी बोरवणकर बोलत होत्या. कॅप्टन (नि.) सी. एम. चितळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. बोरवणकर यांनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मॅडम कमिशनर या पुस्तकासह एकूण तीन पुस्तकांचे लेखन केले आहे. बोरवणकर यांनी या चर्चासत्रात त्यांची जडणघडण, कार्यकाळातील काही महत्त्वाच्या घटना, स्पर्धा परीक्षा, पोलिस दलातील सद्यस्थिती अशा अनुषंगाने भाष्य केले.
बोरवणकर म्हणाल्या, की रोज पाच किलोमीटर जाऊन सरकारी शाळेत, हिंदी माध्यमांत माझे शालेय शिक्षण झाले. आम्ही नागरी सेवेत जावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यानुसार माझ्या बहिणीने आयकर विभाग निवडला. तर मला गणवेशाचे आकर्षण असल्याने मी पोलिस सेवा निवडली. नागरी सेवा हा करिअरसाठी चांगला पर्याय आहे. राज्य आणि राष्ट्रीय अशा दोन स्तरांवर परीक्षा होतात. नागरी सेवा आपल्या भाषेतून देता येत असल्याने इंग्रजीचे दडपण घेण्याची गरज नाही. पोलिस प्रशिक्षणात शारीरिक तंदुरुस्तीवर जास्त भर आहे. मात्र, या प्रशिक्षणात नागरिक संवादावर भर देण्याची गरज आहे. मी सेवेत येताना एकटीच मुलगी होते. मात्र गेल्या काही वर्षांत मुलींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
दर लाख लोकसंख्येमागे २२० पोलिस असणे आवश्यक आहे. मात्र, आपल्याकडे १५३ पोलिसच आहेत. त्यामुळे सरकारने पोलिस दलावर गुंतवणूक करणे, पोलिस भरती करणे गरजेचे आहे. पोलिस दलाविषयी नागरिकांमधील भीती कमी करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. आजच्या काळात नागरिकांनी विशेषतः गप्प राहता कामा नये. पोलिसांना तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्याची गरज आहे, असे बोरवणकर यांनी सांगितले.