संग्रहित छायाचित्र
पुणे महापालिकेच्या मिळकतकर आकारणी विभागाकडून मिळकतकर थकबाकीदारांच्या विरोधात धडक मोहिम राबवत गेल्या १८ दिवसात २७ मिळकती सील केल्या आहेत. तर, ३१७ मिळकतधारकांकडून सुमारे ४० कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. मिळकतकराची वसुली करण्यासाठी मिळकतकर थकविणाऱ्यांच्या दारात महापालिका बँड वाजवून वसूली केली जात आहे. तर थकबाकी नभरणाऱ्यांच्या मालमत्ता सील केल्या जात आहेत.
महापालिकेच्या उत्पन्नाचेा मुख्य स्त्रोत म्हणजे मिळकत कर विभाग आहे. त्यामुळे या विभागाने मिळकतकर वसूली मोहिम राबविली जाते. तसेच मिळकतकर थकबाकीदारांना महापालिकेच्या मिळकतकर आकारणी विभागाकडून नोटीस पाठविली जाते. त्यानंतर थकबाकी जमा केली नाही तर थेट मिळकत सील करण्याची धडक मोहिम राबविली जात आहे. महापालिकेचा कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे.
ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या मिळकत विभागाने थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी संबधितांच्या मिळकतीसमोर बँड वाजविला जात असून, मिळकती सील केल्या जात आहेत. यामध्ये अनेक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांसह नामांकित शैक्षणिक संस्थांचाही समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
शहरातील १४ लाख ८० हजार मिळकतधारकांना २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मिळकतकराची बिले पाठविण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत ८ लाख ८४ हजार मिळकतधारकांकडून सुमारे एक हजार ८४१ कोटी रूपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. तर उर्वरीत सहा लाख मिळकतधारकांनी अद्यापही कर भरलेला नाही. चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात मिळकत कर विभागाला २ हजार ७२७ कोटींचे कर वसूलीचे उदिष्ट देण्यात आले आहे.
यातील ८५० कोटींच्या वसुलीचे उदिष्ट अद्याप बाकी आहे. त्यामुळे कर संकलन विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत. यामध्ये मिळकतींना सील करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. यामधून दिवसाला दोन ते अडीच कोटींची वसुली होत असल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाने यासाठी पथके तयार केली असून संबंधित थकबाकीदाराला यापूर्वी थकबाकी भरण्याबाबत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. पालिकेने नोटीस बजावूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करत थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींची यादी महापालिकेने तयार केली आहे. त्यानुसार संबंधित मिळकतदाराकडे जाऊन मिळकत कर वसुलीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यापुढील काळातही ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती मिळकत कर विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.