संग्रहित छायाचित्र
पुणे : महाराष्ट्र धर्म ही सामाजिक चळवळ होती. त्यात अधिकाधिक लोकांचा सहभाग निश्चित करण्यासाठी त्याला धर्माचे अधिष्ठान देण्यात आले. मात्र, महाराष्ट्र धर्माला जातीय चौकटीत अडकविण्याला सर्वांचा विरोध होता. महाराष्ट्र धर्म ही संकल्पना खूप व्यापक अर्थाने आहे, अशी माहिती राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी लिट फेस्टमध्ये दिली.
पुणे पुस्तक महोत्सवात आयोजित "लिट फेस्ट"मध्ये डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी डॉ. मोरे यांच्याशी संवाद साधला. "महाराष्ट्र धर्म वाढवावा..." हा त्यांच्या चर्चेचा विषय होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी डॉ. मोरे व डॉ. सहस्रबुद्धे यांचे स्वागत केले.
मोरे म्हणाले, "महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र धर्म ही संकल्पना महत्वाची आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस या शब्दाची चर्चा सुरू झाली. ही चर्चा विनोबा भावे यांनी पुढे नेली होती. त्यांनी महाराष्ट्र धर्म नावाचे नियतकालिक सुरू केले होते. महाराष्ट्र धर्माची तीन पावले आहेत, असे विनोबांनी नमूद केले होते. त्यात महाराष्ट्र, देश आणि विश्व ही महाराष्ट्र धर्माची तीन पावले असल्याचे त्यांनी मांडले होते. यावरून महाराष्ट्र धर्म ही संकल्पना खूप व्यापक आणि समावेशक अर्थाने आहे."
महाराष्ट्र धर्म व्यापक. यात कोणालाही बाजूला सरकवले जात नाही. नामदेव महाराज पंजाबला गेले. त्यांनी तेथे भागवत धर्माचा विस्तार केला. त्यांनी पंजाबी लोकांना सामावून घेतले. त्यांच्या धर्म साहित्यात नामदेवांच्या ओव्यांचा समावेश झाला. सयाजीराव गायकवाड बडोद्याला गेले. त्यांनी तिथे भजन रुजवले. बडोद्यातून पंढरपूरपर्यंत वारी यायची. यातून महाराष्ट्र धर्माची व्याप्ती लक्षात येते. महाराष्ट्र धर्म हे मराठ्यांच्या हालचालींचे प्रेरणा स्थान होते. पूर्वीच्या लोकांनी केलेल्या अपेक्षेच्या विरोधाभासाचे चित्र आहे. महाराष्ट्रेत्तर लोकं काय विचार करतात. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठे देशभर अग्रेसर होते. मराठे देशाचे नेते होते, अशी भावना होती. मिलिंद भणगे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
"तुकोबा म्हणजे राष्ट्रीय कवी"
महाराष्ट्र धर्म या संकल्पनेचा अर्थ वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या काळात मांडण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिशांनी तुकारामांची गाथा प्रसिद्ध केली होती. ब्रिटिश अधिकारी ग्रँट याच्यावर तुकोबांचा प्रभाव होता. त्यावेळी महाराष्ट्र धर्म म्हणजे राष्ट्रधर्म आणि त्याचाच दुसरा अर्थ भागवत धर्म असा त्याकाळी घेतला जात होता. संतांमुळे हा धर्म टिकला, असा विचार त्यावेळच्या विचारवंत, अभ्यासकांनी मांडला होता, अशी माहिती डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.
मराठ्यांचा प्रश्न हा जातीचा नसून मातीचा आहे, शेती परवडत नाही त्यामुळे आरक्षणाच्या मागणीत वाढ. तसेच, जात हा राजकारणासाठीचा शॉर्टकट आहे. त्यामुळे आपल्याकडच्या काही लोकांना जात टिकवायची आहे, अशी खंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली. आजच्या पिढीने आपल्या इतिहासाकडे डोळसपणे पाहायला हवे. आपण जगतो वर्तमानात, पण आपली ओळख ही ऐतिहासिकही असते. आपलं राज्याबद्दलचं, देशाबद्दलचं काय कर्तव्य आहे, हे समजून घेतलं पाहिजे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.