उष्णमय जग, वैष्णवाचा धर्म

डोक्यावर रखरखतं ऊन... पायाखाली डांबरी रस्ता... त्यावरून निघणाऱ्या उष्णतेच्या झळा. याची तमा न बाळगता ‘ज्ञानोबाऽ माउली तुकाराम’चा गजर करत, वारकऱ्यांची पावले झपाझप पडत आहेत. यंदाच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे होणारे प्रस्थान हे मागील वर्षापेक्षा १० दिवस अगोदरच होत आहे. त्यातच मान्सूनपूर्व पावसाने पुरेशी हजेरी न लावल्याने तापमान ४० च्या आसपास आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Tue, 13 Jun 2023
  • 08:13 am
उष्णमय जग, वैष्णवाचा धर्म

उष्णमय जग, वैष्णवाचा धर्म

पालखी सोहळा यंदा १० दिवस अलीकडे आल्याने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे निगडी, देहूरोड, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि थेरगावचे सदस्य करणार वारकऱ्यांचे संभाव्य उष्माघातापासून रक्षण

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

डोक्यावर रखरखतं ऊन... पायाखाली डांबरी रस्ता... त्यावरून निघणाऱ्या उष्णतेच्या झळा. याची तमा न बाळगता ‘ज्ञानोबाऽ माउली तुकाराम’चा गजर करत, वारकऱ्यांची पावले झपाझप पडत आहेत.  यंदाच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे होणारे प्रस्थान हे मागील वर्षापेक्षा १० दिवस अगोदरच होत आहे. त्यातच मान्सूनपूर्व पावसाने पुरेशी हजेरी न लावल्याने तापमान ४० च्या आसपास आहे. अनेक वारकरी तर अनवाणी वारी करतात, अशा परिस्थितीत वारकऱ्यांबाबत उष्माघाताच्या घटना होण्याची दाट शक्यता अनेक दिंडी प्रमुखांनी व्यक्त केली आहे. परंतु, राज्यभरातून आणि खेड्यापाड्यातून येणारे वारकरी अशा अडथळ्यांना न जुमानता पंढरीची वाट चालत राहतात.  

संभाव्य उष्माघाताचा दुष्परिणाम टाळण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचा भाग असलेल्या विविध रहिवाशांनी यात पुढाकार घेतला आहे. निगडी, देहूरोड, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि थेरगाव या भागातील ही मंडळी वारीत सहभागी होणार तर आहेच; पण संभाव्य उष्माघातापासून वाचण्यासाठी वारकऱ्यांना प्रशिक्षितही करणार आहेत. 

समितीचे १२० सदस्य यंदाच्या वर्षी पूर्ण पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.  हे सदस्य प्रथमोपचार तर करतीलच; पण कडक उन्हाची शक्यता गृहित धरून पांढऱ्या रंगाच्या टोप्या, सूती स्कार्फ, सुती उपरणे यांचे वाटप करणार आहेत. 

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, "प्रशासनाबरोबर प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती वैष्णवांच्या सेवेकरता तत्पर राहणार असून उरलेले सदस्य दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा स्वयंसेवक आणि विशेष पोलीस ऑफिसर (एस.पी.ओ.) बनून पोलीस प्रशासनास मोलाची मदत करणार आहेत. यंदाची वारी काहीशी लवकर आल्याने आणि पावसाळा लांबल्याने कडाक्याचे ऊन आहे. वारकऱ्यांच्या जिवाला हकनाक धोका निर्माण होऊ नये, यासाठी आमची १२० जणांची टीम वारीत सहभागी होणार आहे. कडाक्याच्या उन्हात शरीरातील तापमान वेगाने वाढू शकते तसेच जलशुष्कताही वाढू शकते. या पार्श्वभूमीवर १० जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी  यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी काय उपाय करता येतील, यावर चर्चा होऊन उपाय करण्याचे ठरले."

"बैठकीला पोलीस मित्र, विशेष पोलीस अधिकारी, समिती विभागीय अध्यक्ष, एल आय बी विभागाचे अजित सावंत, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पदाधिकारी हजर होते. 

समितीचे राज्य संपर्क प्रमुख विजय मुनोत म्हणाले," उन्हात चालताना किती वेळ पाणी प्यावे, डोक्यावर थंड पाण्याचे उपरणे ठेवणे, विश्रांती कधी घ्यावी या बाबी वारकरी लोकांना समजावून सांगितल्या जातील. पुरेशी झोपही आवश्यक असल्याचे सांगितले जाईल. आहारातील बाबीही विशद केल्या जातील."

देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी म्हणाले, "गरज ओळखून प्रशासनाला मदत करणाऱ्या समितीच्या लोकांचे कौतुक कराल तितके कमी आहे. संभाव्य उष्माघात ही बाब अनेकांच्या लक्षात आलीही नसेल. वारी सुखरूप पार पाडण्यासाठी राबणारे हे सगळे हात म्हणूनच महत्त्वाचे आहेत.  

पाण्याच्या टॅंकरची गरज

अधिक महिन्यामुळे आषाढी वारी यंदा साधारण पंधरा दिवस अगोदर सुरू झाली आहे. पाऊसही लांबला आहे. त्यामुळे प्रखर ऊन आहे. शनिवारी (ता. १०) पालखीने देहूतील देऊळवाड्यातून प्रस्थान ठेवले. मात्र, मुक्काम देहूतीलच इनामदारवाड्यात होता. रविवारी वाटचालीचा पहिला दिवस होता. देहू ते आकुर्डी साधारण बारा किलोमीटरचे अंतर आहे. संपूर्ण ऊन अंगावर घेत पहिल्या दिवसाची वाटचाल झाली. मात्र, उन्हामुळे पिण्याच्या पाण्याची गरज तीव्रतेने जाणवली. काही दिंड्यांचे स्वतःचे टॅंकर आहेत. प्रशासनाने टॅंकरची व्यवस्था केलेली आहे. मात्र, विसावा वा विश्रांतीनंतर टॅंकर पुढील मुक्कामाच्या ठिकाणी निघून जातात किंवा सोहळ्याच्या पुढे-पुढे चालत राहतात. त्यामुळे पाणी मिळत नाही. सोहळ्यासोबतच टॅंकर राहिल्यास वारकऱ्यांना पाणी वेळेत मिळेल. शिवाय, पुण्यानंतरची वाटचाल ग्रामीण भागातून राहणार आहे. तिथे पाण्याची व्यवस्था त्वरित होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे प्रशासनाने टॅंकरची संख्या वाढवावी, अशी अपेक्षा वारकरी तथा संताजी जगनाडे महाराज पालखी सोहळ्याचे सचिव अरविंद रत्नपारखी यांनी व्यक्त केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest