पुणे व्हावे ज्ञाननगरी; ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे मत, पुणे पुस्तक महोत्सवाचा समारोप

डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘पुणे पुस्तक महोत्सवाने वाचनाची संस्कृती वृद्धिंगत केली आहे. नव्या पिढीने पुस्तक हाती घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित आहे. महोत्सवाला भारत आता बेडूक उडी नाही, तर हनुमान उडी घेत आहे. महोत्सवाच्या पुण्यात पुणे पुस्तक महोत्सवाची वेगळी ओळख निर्माण होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 23 Dec 2024
  • 12:44 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुण्याचे अनुकरण देश करतो. पुण्यातील प्रत्येक घर ज्ञानमंदिर झाल्यास पुण्याचे रुपांतर ज्ञाननगरीत होईल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात डॉ. माशेलकर बोलत होते. केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, संयोजन समितीचे सदस्य प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, डॉ. संजय चाकणे, डॉ. आनंद काटीकर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, लोकमान्यचे सुशील जाधव, सुहानाचे विशाल चोरडिया, लेखक दिग्दर्शक चंद्रप्रकाश या वेळी उपस्थित होते. मिरॅकल इव्हेंट्सचे विनायक रासकर यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘पुणे पुस्तक महोत्सवाने वाचनाची संस्कृती वृद्धिंगत केली आहे. नव्या पिढीने पुस्तक हाती घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित आहे. महोत्सवाला भारत आता बेडूक उडी नाही, तर हनुमान उडी घेत आहे. महोत्सवाच्या पुण्यात पुणे पुस्तक महोत्सवाची वेगळी ओळख निर्माण होत आहे. जागतिक मराठी परिषदेचा अध्यक्ष असताना ज्ञानाधिष्ठित समाजाचा विचार मांडला होता. मराठी टिकण्यासाठी ती ज्ञानभाषा व्हायला हवी. मुंबई पुण्यासह सर्वत्र मराठी शाळा बंद पडत आहेत हे वेदनादायी आहे. मराठी टिकवण्यासाठी मराठी शाळा टिकवण्यासह त्या उत्तम पद्धतीने चालवाव्या लागतील.’’

‘‘नऊ दिवस अनेक प्रकारचे कार्यक्रम महोत्सवात झाले. पुणे पुस्तक महोत्सव ही पुण्याची आणखी एक ओळख, नवे आकर्षण निर्माण झाले आहे. पुण्याच्या महोत्सवाची चर्चा दिल्लीत झाली. हे पुणेकर म्हणून अभिमानास्पद आहे. पुढील वर्षी अधिक मोठा आणि अधिक कालावधीचा महोत्सव करावा लागणार आहे,’’ असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले, ‘‘पुणे पुस्तक महोत्सवाला महोत्सव म्हणणे जरा अयोग्य आहे. ज्ञानयज्ञ, ज्ञानसत्र म्हणणे योग्य आहे. भारताची ज्ञानपरंपरा अशीच प्रवाहित राहिल्यास ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.’’

राजेश पांडे म्हणाले, ‘‘पुणेकरांनी नऊ दिवस पुस्तक महोत्सवाला दिलेल्या प्रतिसादामुळे ऊर्जा वाढली आहे. चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. महोत्सवामुळे पुण्याचा महोत्सव राहिला नाही. राज्यभरातून लोक महोत्सवाला येतात. तरुणांचा सहभाग फार मोठा आहे. तरुण वाचत नाहीत हा समज खोटा ठरला आहे. १० लाख लोकांनी महोत्सवाला भेट दिली. ४० कोटी रुपयांची उलाढाल झाली. एक हजारांपेक्षा जास्त लेखक महोत्सवात सहभागी झाले. चार विश्वविक्रम नोंदवले गेले. २५ पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम झाले. १००पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली. पुणे लिट फेस्टमध्ये मान्यवरांचा सहभाग होता. १२ लाख पुस्तकांद्वारे चार विश्वविक्रम नोंदवले गेले. पुणे पुस्तक महोत्सव सामूहिक प्रयत्नांचा आविष्कार आहे. 

५१व्या डी.लिट. निमित्त सन्मान

डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ५१वी डी.लिट. पदवी मिळाल्याबद्दल पुणे पुस्तक महोत्सवात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या पूर्वी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ४७ डी.लिट. मिळाल्या होत्या. डॉ. माशेलकर हे सर्वाधिक डी.लिट.चे मानकरी आहेत.

आता, शांतता... महाराष्ट्र वाचत आहे

यंदाचा महोत्सव गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट मोठा होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तो चौपट, पाचपट मोठा झाला. ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत,’ या धर्तीवर ‘शांतता... महाराष्ट्र पुस्तक वाचत आहे,’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. दोन हजार नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुर्मिळ ग्रंथांचे टप्प्याटप्प्याने डिजिटायझेशन करण्यात येणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest