नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पीएमआरडीएकडून निष्कासनाची कारवाई
पुणे / पिंपरी (दि.२३) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सोमवारी (दि.२३) निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सकाळी ७ वाजेच्या सुमारास अनधिकृतपणे उभारलेले २५ पत्राशेड गाळे काढून टाकण्यात आले. रहदारीचा विचार करुन संबंधितांसह इतरांनी सुद्धा अनधिकृत बांधकाम नये, असे आवाहन पीएमआरडीएच्या अधिकारी, कर्मचारी यांनी केले.
पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या वतीने गत काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत असून संबंधित बांधकामे निष्कासित करण्यात येत आहे. सोमवारी पीएमआरडीएच्या पथकाने नवले ब्रिज भागात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी दिलीप दादा नवले, वैशाली दांगट, सारंग नवले, अतुल चाकणकर, विकास नाना दांगट यांच्यासह आदींचे अनधिकृतपणे उभारलेले २५ पत्राशेड गाळे काढून टाकण्यात आले.
सदरीची कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन म्हस्के, रविंद्र रांजणे, पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे, कनिष्ठ अभियंता विष्णू आवाड, गणेश जाधव, अभिनव लोंढे यांच्यासह पोलीस कर्मचारी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी यांनी केली. पीएमआरडीएच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगसह बांधकामांचा सर्वे सुरु असून निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांनी परवानगी घेवूनच बांधकामे करावीत, यासह चालू असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. नवले ब्रिज भागातील आजच्या कारवाईमुळे निश्वितच वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी व्यक्त केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.