भीमथडी जत्रेत छोट्या-मोठ्या बचत गटांना उपलब्ध झाली मोठी बाजारपेठ
पुणे : भीमथडी जत्रेचे यंदाचे १८ वे वर्ष आहे. पुणे आणि राज्यांतील इतर भागातील महिलांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ जत्रेमध्ये उपलब्ध करून दिली आहे. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फौंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जत्रेमध्ये विविध शेतकरी उत्पादक संघटनांच्या सेंद्रिय उत्पादनांसोबतच घरगुती हस्तकलेच्या विविध वस्तूंना स्थान मिळाले आहे.
या मध्ये सिद्धटेकच्या बचत गटाची सुती व हाताने शिवलेली गोधडी, वीजे वरील कास्त पायाची मसाज थाळी, पोळपाट लाटणे, कोळवडीची प्रसिद्ध हळद, बेलगावचे वाळवन पदार्थ, सेंद्रिय घाणा तेल, भाजीपाला पावडर, हॅन्डमेड चॉकलेट, कापडी फॅब्रिकवरील हॅन्ड पेंटिंग, धूप , कापूर , अगरबत्ती, फुल वाती, सिद्धटेकचे फेमस लेदर वर्क, भीमथडी सिलेक्ट मधील हस्तकलेच्या विविध वस्तू, विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सेंद्रिय पदार्थ, मिलेटची आइस्क्रीम, सोलापूरची प्रसिद्ध ज्वारी, गृहोपयोगी लाकडी वस्तू, कापडापासून बनविलेल्या श्रृंगारीक वस्तू, सुतळी व लोकरीच्या वस्तू, दीपस्तंभ मनोबल फौंडेशनच्या दिव्यांग मुलांच्या माध्यमातून बनविलेली दोऱ्याच्या विविध कलाकृती, गिर गायीच्या शेणापासून तयार केलेल्या आकर्षक वस्तू, स्वराज गुळपट्टी, चाळीसगावचे प्रसिद्ध मडक्यावरील मांडे, मासवडी, रगडा पापड, शेंगुळी, झुणका भाकरी , गुळभेंडी हुरडा, दही थालीपीठ, खपली गव्हाची खीर यासह मांसाहारी पदार्थाचे विविध स्टॉल यासर्वांचा भिमथडीत चांगला व्यावसाय होत आहे. अनेक छोट्या मोठ्या बचत गटांना भिमथडीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.
यावर्षीही पुणेकरांनी जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज सोमवार असतानाही लोकांची मोठी वर्दळ दिसली. २५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या जत्रेला पुणेकरांनी भेट द्यावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.