भाजप जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे हे वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी अमोल झेंडे यांना निवेदन देताना....
पुणे : सोलापूर महामार्गावर शेवाळेवाडी गावात जाण्यासाठी असणाऱ्या शेवाळेवाडी फाटा चौकात वाहतूक कोंडी होत आहे. नव्याने दिलेल्या यु टर्न मुळे वाहतूक कोंडी बरोबरच लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे या चौकातील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकारी श्रुती नाईक आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी अमोल झेंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी आज येथील चौकाची पहाणी केली असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले आहे. आज सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सुर्वे, हडपसर वाहतूक पोलीस अधिकारी धनंजय पिंगळे, बाबू गदादे तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता अतुल सुर्वे यांनी चौकाची पहाणी केली.
याबाबत राहुल शेवाळे म्हणाले की, "पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळेवाडी फाटा येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. शेजारीच पीएमटी बस डेपो आहे .त्यामुळे शेकडो बसची ये-जा सुरु असते. बस डेपो समोरील पंक्चर बंद करुन त्या बस मांजरी फार्म येथून वळवणे गरजेचे आहे. तसेच शेवाळेवाडी फाटा चौक यूटर्नसाठी शास्त्रीय नसल्याने गेली काही महिन्यांपासून तो अपघाताचा स्पॉट झाला आहे.चौकात दुतर्फा मोठया प्रमाणात अतिक्रमण ही झाले आहे. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. कायम वाहतूक कोंडी होत आहे. सिग्नलचे टायमिंग, त्याचे पालन करताना येणारा विस्कळीतपणा आणि त्यामुळे सतत होणारी वाहतूक कोंडी अपघाताला निमंत्रण देत आहे. त्या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियंत्रक नेमणे आवश्यक आहे." तसेच दोन महिन्यांपूर्वी मांजरी स्टड फार्मच्या समोरील पंक्चर बंद केल्यामुळे शेवाळेवाडी फाट्यावरील वाहतुकीचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. यामुळे गावात जाणाऱ्या नागरिकांना व शालेय विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेवाळेवाडी फाटा येथील सध्या असलेला पंक्चर मोठा करून येथे नियमित वाहतूक पोलीस ठेवावेत, असेही शेवाळे यांनी सांगितले आहे.
यावेळी माजी सभापती अशोक मोरे, नंदकुमार घुले, बाळासाहेब मोरे, संजय कोदरे, संभाजी हाके, विजय कोदरे , विलास शेवाळे ,राजेंद्र घुले , अविनाश भंडारी , प्रशांत वाघ , अशोक कामठे, चंद्रकांत शेवाळे, प्रविण शेवाळे, बाळकृष्ण शेवाळे, मंगेश शेवाळे , मोहन शेवाळे, तेजस कलाल अक्षय थोरात , सिद्धार्थ शेवाळे , रवींद्र बहिरट, कैलास जैस्वाल उपस्थित होते.