संग्रहित छायाचित्र
पुणे: विविध मागण्यांसाठी बार्टी संशोधक विद्यार्थी कृती समिती २०२२ च्या वतीने सोमवारी (६ जानेवारी) सकाळी ११ वाजता आक्रोशात्मक आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे करण्यात येणार आहे.
बार्टी प्रशासनाच्या अन्यायकारक वागणुकीविरोधात हे आंदोलन असणार असल्याचे एका पत्रकाद्वारे घोषित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:
१) बीएएनआरएफ २०२२ च्या पी.एच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना २ वर्षाची फेलोशिप व एचआरए, कॉन्टेंजन्सी फी ची रक्कम नोंदणी दिनांकापासून तात्काळ बँक खात्यात टाकण्यात यावी.
२) बार्टीमधील भेदभाव करणाऱ्या पी.एच.डी. संशोधन विभागाच्या कंत्राटी कर्मचारी सारिका थोरात यांची तात्काळ बदली करण्यात यावी.
३) अपमानास्पद वागणूक देणाऱ्या बार्टी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना समज देण्यात यावी.
४) दोन वर्षाच्या हजेरीकरिता बार्टीमार्फत विद्यार्थ्यांच्या हितासाठी परिपत्रक काढण्यात यावे.
एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सीविक मिररला सांगितले की, नियमित संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टीकडे सहामाही अहवाल सादर करावे लागतात. मात्र, बार्टी प्रशासनाकडून या प्रक्रियेला दिरंगाई झाल्यामुळे मागील अहवाल महाविद्यालय किंवा विद्यापीठ घेण्यास तयार नाहीत. तसेच विद्यार्थ्यांना सहामाही अहवाल सादर करण्यासाठी अनेक जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये उपस्थिती सादर करण्यास सांगण्यात आली आहे. मात्र, संशोधक विद्यार्थी संशोधनासाठी बाहेर असतात त्यामुळे त्यांची उपस्थिती लागत नाही. अशाप्रकारे अहवाल सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. शिक्षण संस्था सांगत आहेत की, यामुळे आम्ही अडचणीत येऊ तुम्हाला मागील अहवाल कसा देता येईल. मात्र, बार्टी संशोधन संस्थेचे म्हणणे आहे की, मागील अहवाल सादर केला जाणार नाही तोपर्यंत तुमचे पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे निधी मंजूर असून देखील काही विद्यार्थी बार्टी फेलोशीप पासून वंचित राहणार आहेत.