संग्रहित छायाचित्र
जगभरातील वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांच्या यादीत पुण्याचा सातवा क्रमांक लागतो, तर देशात वाहतूककोंडीत पुण्याचा दुसरा क्रमांक लागतो. देशात एक नंबरवर बंगळुरूचा नंबर लागतो त्याखालोखाल पुण्याचा नंबर लागतो. त्यामुळेच शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पुणे पोलीस व पुणे महापालिकेने एकत्र येऊन अंतर्गत रस्त्यांवरील अडसर दूर करण्यावर भर दिला असून त्यामुळे या रस्त्यांवरील वाहनचालकांवरील कोंडीत अडकून पडण्याचे प्रसंग कमी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारी (दि. ४) पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील व पालिकेच्या पथविभागाचे मुख्य अभियंते अनिरुद्ध पावसकर यांच्याकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. 'मिशन फिफ्टीन'च्या माध्यमातून पुणे शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी त्या रोडवर सुधारणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. रामटेकडी चौक, काळूबाई चौक, सोपानबाग चौक, फातीमानगर चौक, भैरोबानाला चौक, मम्मादेवी चौक, गोळीबार मैदान चौक, रामटेकडी ओव्हरब्रीज, वैदवाडी चौक, हडपसर वेस चौक, गाडीतळ चौक, रविदर्शन चौक, पंधरा नंबर चौक आणि लक्ष्मी कॉलनी चौक या रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी नव्याने सुधारणा करण्यात आली आहे.
या रस्त्यांवर नेमक्या काय सुधारणा केल्या आहेत?
अनेक रस्त्यांच्या मध्ये दुभाजकांमुळे अडथळा निर्माण होत होता. ते असे दुभाजक काढून रस्ता रुंद करण्यात आला आहे. रस्त्यामध्ये येणारे बसथांबे रस्त्याच्या कडेला हलवण्यात आले आहेत. सिग्नलचे पोल, इलेक्ट्रिकल पोल शिफ्ट करण्यात आले आहेत. शहरातील जे रस्ते अरुंद होते त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. अनेक रस्त्यांवर नावाचे बोर्ड हे मधोमध दुभाजकांजवळ लावलेले होते तेही हटवण्यात आले आहेत. अनेक रस्त्यांच्या चौकात खड्डे होते ते बुजवून तिथे रोड सर्फेसिंग केले आहे. वाहतूक कोंडी होत असणाऱ्या रस्त्यांवर नव्याने यू टर्न देण्यात आले आहेत. काही प्रमुख रस्त्यांवरील स्ट्रेट कंटिन्यू सिग्नल सुरू ठेवण्यात आले आहेत. राईट व लेफ्ट टर्न प्रायोगिक तत्त्वावर बंद करण्यात आले आहेत. दुभाजकांवरील इलेक्ट्रिक पोल इतरत्र हलवण्यात आले आहेत. रस्त्यांना अडथळा निर्माण होणारे पादचारी मार्ग काढून तिथे रस्ता रुंद करण्यात आला आहे. रस्त्यांवर नागरिकांकडून केले जाणारे अतिक्रमणदेखील हटवण्यात आले आहे.
पावसाचे पाणी साचल्याने काही भागात वाहतूककोंडी होत होती त्या रस्त्यांवरील चेंबरची संख्या वाढवली गेली आहे. यासोबतच काही मुख्य रस्त्यांवरील सिग्नलची वेळ वाढवण्यात आली आहे. रस्त्याच्या कडेला थांबणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सना आतल्या बाजूला थांबा देण्यात आला आहे. अनेक चौकातील फुटपाथची रुंदी कमी करून रस्त्याची रुंदी वाढवण्यात आली आहे.