संग्रहित छायाचित्र
विचारभिन्नता नव्हे तर विचारशून्यता ही आपल्या देशासमोरील समस्या आहे. आपली बांधीलकी कशासोबत आहे, हे लोकांना माहीत असले पाहिजे. पक्षात आणि संघटनेमध्ये कार्यकर्त्यांचा माणूस म्हणून विचार करायला हवा जो केला जात नाही. अलीकडे सत्ता येईल तिकडे नेते पळतात, सत्ता गेली की तिथून दुसरीकडे उड्या मारतात, जीवनात पैसा हा महत्त्वाचा असला तरी सर्वस्व नाही. त्याचप्रमाणे आरोग्यालाही महत्त्व द्यायला हवे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केले.
मराठा सेवा संघ व पुरुषोत्तम खेडेकर अमृतमहोत्सव गौरव समिती यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय घोगरे (अध्यक्ष मराठा सेवा संघ, महाराष्ट्र, अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर अमृतमहोत्सव समिती) होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, पुरुषोत्तम खेडेकर, आमदार रेखा खेडेकर, माधवराव पाटील शेळगावकर, ख्यातनाम कवी इंद्रजित भालेराव, कर्नाटकमधील आमदार डॉ. मारोतराव मुळे, माजी आयपीएस अधिकारी विक्रम बोके, व्यंकटराव गायकवाड (निवृत्त सचिव जलसंपदा विभाग), हेमंतकुमार देशमुख (मुख्य अभियंता), विठ्ठलराव गायकवाड, गिरीश जोशी (मुख्य अभियंता, अमरावती), आमदार शंकर जगताप, राजेंद्र पवार, रवींद्र माळवदकर, माजी आमदार विलास लांडे, राजेंद्र डुबल आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मदन पाटील लिखित ‘क्रांतिपुरुष पुरुषोत्तम खेडेकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान सत्काराला उत्तर देताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या कार्याचा आढावा घेतला, एक शासकीय अधिकारी म्हणून काम करताना आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करून सामाजिक संघटन कसे वाढविले व नोकरीत असताना तरुणांना रोजगाराच्या संधी कशी उपलब्ध करून दिल्या याची माहिती दिली.
सामाजिक विषमता संपुष्टात आली पाहिजे
समाजातील अस्पृश्यता, जातीयता, विषमता संपुष्टात आली पाहिजे. कारण तुमची गुणवत्ताच तुम्हाला श्रेष्ठ बनवते. ज्यामुळे जातपात, भाषा, राज्य आणि पंथाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला ओळख मिळते. ही गुणवत्ता ज्ञानातून मिळते. आज जर भारताला विश्वगुरू बनायचे असेल तर ज्ञान महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. मी माझ्या आई-वडिलांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. कारण प्रत्येक पायंड्यावर त्यांच्यासारखा आदर्श राजा दुसरा कोणी नाही. ते खऱ्या अर्थाने सेक्युलर होते. कारण सर्वधर्म समभाव असणारे ते एकमेव राजे होते. त्यांनी स्वराज्याचा विस्तार करताना दुसऱ्या धर्माची प्रार्थनास्थळे पाडली नाहीत, कोणत्याही महिलांवर अन्याय, अत्याचार केले नाहीत, असेही गडकरी यांनी नमूद केले.