पुण्यात जनआक्रोश मोर्चाला सुरुवात
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सकल मराठा समाजाकडून जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. यात देशमुख कुटुंबिय देखील सामील झाले आहे. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे.
संतोष देशमुखांचे कुटुंबीय व मनोज जारंगे यांनी लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुरुवात केली. मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी धनंजय मुंडे शहाणा हो..अशा शब्दात जरांगेंनी पुन्हा निशाणा साधला.
पुण्यात काढण्यात आलेल्या या मोर्चाला अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित आहेत.
धनंजय मुंडे शहाणा हो...जरांगेंनी पुन्हा डागली तोफ
लक्ष्मण हाके यांच्या इशाऱ्यानंतरही मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर तोफ डागली आहे. धनंजय मुंडे शहाणा हो, मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवरावं नाहीतर आम्ही थांबणार नाही. आमचे लोकं तुला अडकवतील, ज्या मराठ्यांनी वाचवलं त्यावर तुम्ही पलटला आहात, प्रतिमोर्चे काढले तर आम्हीदेखील तसेच उत्तर देवू, असं जरांगे यावेळी म्हणाले.
तसेच, संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केली. राज्य यांना कुठं न्यायचं आहे. या विरोधात राज्यभर आम्ही मराठे मोर्चे काढू. हा खून आमच्या जिव्हारी लागला आहे. आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे, त्यांना जातीय तेढ निर्माण करायची आहे, सरकारमध्ये राहून यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे. मुख्यमंत्र्याच्या शब्दावरती मराठे शांत आहेत. हे लोकं आम्हाला खुप त्रास देत आहेत. एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल, त्यामुळे सर्वांना शिक्षा द्या. आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत, मुंडेंनी हे सगळं थांबवावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
सर्व आरोपी पुण्यात कसे? पोलिसांच्या कारभारावर जरांगेंचा सवाल
जरांगेंनी आरोपींच्या अटकेबाबतही प्रश्नचिन्ही उपस्थित केलं आहे. संतोष देशमुख यांचे मारेकरी पुण्यात कसे सापडले? हे आरोपी बीडमधून थेट पुण्यात का आले? या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे होण्याची गरज आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हाली, अशी मागणीदेखील जरांगे यांनी यावेळी केली.
निकटवर्तीयांना अभय मिळायला नको- पृथ्विराज चव्हाण
सरकार टिकवण्यााठी निकटवर्तीयांना अभय मिळायला नको, अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करत माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. देशमुख यांच्या हत्येच्या दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. गुंतवणुकदारांना खंडणीखोरांचा त्रास झाला. तर ते राज्यात येणार नाहीत. असही चव्हाण यावेळी म्हणाले.
आम्हाला न्याय कधी मिळणार. आम्हाला न्याय हवा आहे- वैभवी देशमुख (संतोष देशमुख यांची मुलगी)
आरोपीला अजून शिक्षा झाली नाही, यावर मत विचारलं असता वैभवी देशमुख म्हणाल्या, 'आज महिना होत आहे अजूनही न्याय मिळत नाही. प्रशासनाला माझी विनंती आहे की, जे आरोपी आहेत आणि जे काही कोणी त्यांना मदत करत आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी.
तसेच धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात विचारलं असता, वैभवी म्हणाल्या, ते मला काही माहिती नाही, चाचूला माहिती असेल. आम्हाला फक्त न्याय हवा आहे.
तर आज माझा भाऊ जिवंत असता - देशमुख यांचा भाऊ
गृहमंत्र्यांचं कुठे तरी अपयश आहे का? असं तुम्हाला वाटतं का या प्रश्नावर उत्तर देताना देशमुख यांच्या भावाने मुख्यमंत्र्यांची आम्ही लवकरच भेट घेणार आहोत. असं सांगितलं. तसेच, आम्हाला न्याय पाहिजे. आरोपीला फाशी झाली पाहिजे. आरोपी खुप सराईत आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर ज्या त्यावेळी कारवाई केली असती तर आज माझा भाऊ जिवंत असतो.