संग्रहित छायाचित्र
बस स्थानकातून दररोज प्रवाशांच्या सोईसाठी तीस वर्षांपूर्वी सुरू केलेली भोर ते स्वारगेट विनाथांबा एसटी बससेवा प्रशासनाने अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे कारण देत नव्या वर्षात बंद केली. त्यामुळे नोकरी, व्यवसाय व इतर कारणाने पुण्याला ये-जा करणारे नोकरदार आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. एसटी प्रशासनाने नव्या वर्षात प्रवाशांना अशी भेट दिल्याने प्रवाशांत नाराजीची भावना आहे. बसचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांमध्ये अगोदरच तीव्र संताप असताना विनाथांबा बससेवा बंद केल्याने प्रवाशांमध्ये अधिक नाराजी आली आहे. सध्या येथील एसटी सेवा बेभरवशाची झाली आहे.
नोकरदार, व्यापारी यांच्या मागणीनुसार तीस वर्षांपूर्वी सकाळी आणि सायंकाळी अशा विनाथांबा दोन बस सुरू केल्या होत्या. प्रवाशांची वाढती संख्या आणि बसचा प्रतिसाद विचारात घेऊन अधिक बस सुरू झाल्या. सध्या दिवसभरात २४ विनाथांबा बसफेऱ्या सुरू होत्या. मात्र, करोना काळापासून येथील आगाराला अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने नियमितपणे सुरू असणाऱ्या फेऱ्या बंद करण्याचा सपाटा लावला आहे.
मुदतबाह्य झालेल्या आणि वारंवार बंद पडणाऱ्या जेमतेम ३६ बस भोरच्या आगारात आहेत. कर्मचारी संख्याही अपुरी आहे. त्यातून पुणे, वाशी, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक व ग्रामीण अशा १७२ फेऱ्यांचे दररोज नियोजन असते. त्यापैकी वाशी, सोलापूर, संभाजीनगर या चार मार्गांवर बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. उर्वरित सर्व मार्गांवर कमी अधिक प्रमाणात तोटा होत असल्याचे सांगितले जाते.
नोकरीनिमित्त अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
या निर्णयामुळे रोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. सध्या दररोज विविध कारणांनी सरासरी ४० टक्के बसफेऱ्या रद्द होत आहेत. विनाथांबा स्वारगेटला जाणारी बस भरून जाते. मात्र, येताना प्रवासी संख्या कमी असल्याने दररोज मोठा तोटा होतो. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे कारण एसटी प्रशासनाने दिले आहे. विनाथांबा बस बंद केल्या तरी दररोज सर्व थांबा बसच्या २२ फेऱ्यांचे नियोजन केल्याचे स्थानकप्रमुख प्रदीप इंगवले यांनी सांगितले. त्याचे नियोजन काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी (दि. २ ) दुपारपर्यंत चार फेऱ्या रद्द झाल्या होत्या.