संग्रहित छायाचित्र
देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाचे दर्शन घेण्यासाठी येतात. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी अनेक संघटना आणि कार्यकर्ते करत आहेत. सरकारने याची दखल घेऊन विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. आठवले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आम्ही दोन जागा मागितल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतही आम्ही जागा मागितल्या होत्या. पण, आम्हाला एकही जागा मिळाली नाही. आता राज्य सरकारमध्ये एक मंत्रिपद शिल्लक आहे, ते रिपब्लिकनला द्यावे. तसेच पुण्यात रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद आहे. गेल्या वर्षी आपल्याला उपमहापौरपद देण्यात आले होते, मात्र आगामी महापालिका निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाला महापौरपद मिळावे, अशी मागणी आठवले यांनी केली.