पुणे : पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी तुंबले पुणे?

पावसाच्या पहिल्याच तडाख्यात महापालिकेने केलेले पावसाळापूर्व कामाचे दावे वाहून गेले आणि दुसरीकडे पुण्यातल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आपसातील समन्वयाअभावी पुणे तुंबल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Pune News

पुणे : पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी तुंबले पुणे?

पालिका आयुक्तांना काढावा लागला आदेश कनिष्ठ, उपअभियंता आणि सहायक आयुक्तांमध्ये समन्वय राखण्याच्या सूचना अभाव

पुणे : पावसाच्या पहिल्याच तडाख्यात महापालिकेने केलेले पावसाळापूर्व कामाचे दावे वाहून गेले आणि दुसरीकडे पुण्यातल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आपसातील समन्वयाअभावी पुणे तुंबल्याची चर्चा सुरू झाली आहे. अधिकाऱ्यांमध्ये काम करताना नसलेला समन्वय याला कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे थेट पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनाच याबाबत आदेश काढावे लागले आहेत. (PMC)पावसाळ्या दरम्यानच्या कामामध्ये तांत्रिक संवर्गातील सेवक व संबधित विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यामध्ये समन्वय राखण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तांत्रिक संवर्गातील सेवक असलेल्या कनिष्ठ अभियंता, उप अभियंता आणि संबधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांमध्ये समन्वय महत्वाचा असलेंचे आयुक्त डॉ. भोसले यांनी आदेशात नमूद केले आहे. यासोबतच या सर्वांना त्यांच्या कामकाजाची नियमावली देखील ठरवून देण्यात आली आहे. (Pune News)

महानगरपालिकेच्या हद्दीत पावसाळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, वृक्ष उन्मळून पडणे, मलवाहिन्या तसेच पावसाळी वाहिन्यांमध्ये गाळ साचणे, ड्रेनेज चेंबरच्या जाळ्यावर कचरा साचणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्याचा फटका नुकताच झालेल्या मागील दोन तीन पावसात बसला आहे. पुणेकरांना त्याचा त्रास देखील सहन करावा लावला आहे. अशा वेळी महानगरपालिकेची क्षेत्रिय कार्यालये, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, पथ विभाग, उद्यान विभाग, प्रकल्प विभाग, विद्युत विभाग इत्यादी मुख्य खात्यांकडून करण्यात येणारी कामे, त्यांच्याकडील कायम स्वरूपी तसेच कंत्राटी मनुष्य बळ देखील क्षेत्रिय स्तरावर कार्यरत करण्याचे संकेत आहेत. मात्र, अनेकदा पालिकेचे कर्मचारी गायब असतात. आपत्कालीन परिस्थितीत अशा वेळी यंत्रणेची धावपळ होते. वेळेत मदत पोचविणे अवघड होते. 

त्यामुळे पावसाळा कालावधीत पालिकेची विविध खाती तसेच क्षेत्रिय कार्यालय स्तरावर कार्यरत असलेले तांत्रिक संवर्गातील सेवक व संबधित सहाय्यक आयुक्त यांच्यामध्ये समन्वय-संवाद-संपर्क असणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या मुख्य खात्याकडील क्षेत्रिय स्तरावर कार्यरत कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, मुख्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिमंडळ स्तरीय उप आयुक्त यांच्याशी देखील दैनंदिन संपर्कात राहण्याचे आणि एकमेकांशी समन्वय साधून पावसाळ्या दरम्यान करावयाची विविध कामे यावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत बचाव व मदत कार्यासाठी तत्परता दाखवाणे,  कर्तव्यावर हजर राहणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांनी सूचना केल्या आहेत. 

प्रमुख नियम 
१. महापालिकेच्या मुख्य खात्याकडील क्षेत्रिय स्तरावर कार्यरत असणारे तांत्रिक सेवक, कनिष्ठ अभियंता, उप अभियंता यांनी पावसाळा कालावधीत संबधित सहाय्यक आयुक्त, परिमंडळ उपआयुक्त यांच्याशी समन्वय साधावा. त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामकाज करण्याबाबत सजग असावे. 
२. मुख्य खात्याच्या सेवकांनी समन्वयाचा अभाव तसेच आपत्ती व्यवस्थापनासंबंधी नेमून दिलेल्या कर्त्यव्यात कसूर करू नये. कसूर केल्यास सेवक, अधिकारी यांच्याबाबत संबधित परिमंडळ उप आयुक्त यांनी संबंधित खातेप्रमुख, आयुक्त यांना ही बाब निदर्शनास आणून द्यावी. 
३.  सर्व खातेप्रमुखांनी याबाबतचे आदेश त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रिय सेवक, अधिकारी यांना निदर्शनास आणून द्यावेत व आदेशाची अंमलबजावणी करावी.

पावसाळी संबंधी कामांसाठी क्षेत्रीय कार्यालय जवळचाच ठेकेदार
पावसाळी कामांसाठी पालिकेला अतिरिक्त मनुष्यबळासह  साधनसामुग्रीची आवश्यकता भासते. त्यामुळे पावसाळी कामांच्या निविदा प्रक्रिया राबविताना या कामांसाठीचा कंत्राटदार हा संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमधील अथवा हद्दी जवळचाच असावा, असे आदेश आयुक्त डॉ. भोसले यांनी प्रशासनाला दिले आहेत. पावसाळी वाहिन्यांची व मलवाहिन्यांची सफाई करणे, चेंबर सफाई आदी कामांसाठी पालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या मुख्य खात्याकडून निविदा प्रक्रिया राबविली जाते. या कामांसाठी पावसाळा कालावधीत मनुष्यबळ व साधन सामुग्री पुरविणे या कामाचा देखील समावेश असतो. आकस्मिक व आपत्कालीन प्रसंगी अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामुग्रीची आवश्यकता भासू शकते. याकरिता मुख्य अभियंता पथ/ प्रकल्प विभाग, मलनिस्सारण विभाग यांनी आवश्यकतेनुसार तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. मुख्य खात्यांनी त्यांच्या विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या कंत्राटदारांकडून मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीची माहिती आपापल्या क्षेत्रिय कार्यालयाला उपलब्ध करून द्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest