पुणे: कात्रज-कोंढवा रस्त्याचा निधी अडला कुठे?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने नागरिकांना खूश करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी १४० कोटी रुपये महापालिकेला देण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.

संग्रहित छायाचित्र

रस्त्याच्या कामासाठी मंजूर निधी न आल्याने काम बंद, अपघात वाढले, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा घोषणा होणार असल्याची चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने नागरिकांना खूश करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी १४० कोटी रुपये महापालिकेला देण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. त्यानंतर निधी येईल, असे महापालिकेला वाटले होते. मात्र अद्यापही निधी न आल्याने या रस्त्याचे काम बंद पडले आहे.

काम रखडल्याने या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात अल्पवयीन मुलींना जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही राज्य सरकारला जाग येत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आता हा निधी विधान सभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदारांना खूश करण्यासाठी महापालिकेच्या खात्यावर जमा केली जाईल, अशी चर्चा रंगली आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या (Katraj-Kondhwa Road) कामाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते २०१९ मध्ये झाले आहे. या रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन वेगाने काम पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले होते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्याचे काम संथ गतीने सुरु होते. त्यावेळीदेखील अपघातांचे सत्र सुरुच होते. अलीकडच्या काळात निधी नसल्याने रस्त्याचे काम बंद पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन जाताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अवघ्या एक दिवस आधी हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याने निधी महापालिकेच्या खात्यावर जमा होईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु याबाबतचा केवळ शासन आदेश आला असून अद्याप एकही रुपया जमा झालेला नाही. राज्य सरकारच्या विभागातून पैसे पाठवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहेत. मग पैसे नेमके कोठे अडकले आहेत? कोणी अडवून ठेवले आहेत, याची माहिती महापालिकेच्याच अधिकाऱ्यांना समजत नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडेही उत्तर नसल्याची माहिती महापालिकेच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सीविक मिरर’ला दिली.

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादनासाठी पुणे महापालिकेने २०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र केवळ १४० कोटी रुपये निधी देण्याची मान्यता मंत्रिमंडळात देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. वाढती वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे रुंदीकरणाचे काम वेगाने करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच जे नागरिक जमीन देण्यास नकार देत होते. त्यांची समजूत काढून त्यांना मोबदला देण्यासाठी राज्य सरकारने निधी देण्याचे जाहीर केले होते. या रस्त्यासाठी आचारसंहितेनंतर निधी दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असल्याने मतदारांना खूश करण्यासाठी निधीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर शासन आदेश आला. पण निधीच आला नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण पुण्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रुंदीकरण करण्यात येणार आहे. पुणे शहराच्या मंजूर विकास योजना आराखड्यामध्ये ८४ मीटर रूंदीचा विकास योजना रस्ता (कात्रज-कोंढवा) दर्शविलेला आहे. कात्रज कोंढवा रस्त्याचे ८४ ऐवजी आता ५० मीटर रुंदीकरण केले जाणार आहे. यामुळे भूसंपादनाचा खर्च २८० कोटी रुपये इतका येणार होता. त्यानुसार २०० कोटी रुपयांची मागणी राज्यसरकारकडे केली होती. मात्र राज्य सरकारने २०० कोटी ऐवजी १४० कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असणार्‍या जागेच्या भुसंपादनात अनंत अडथळे येत होते. या रस्त्याच्या रूंदीकरण्यासाठी जागामालकांशी थेट संवाद साधून त्यांना मोबदला कसा दिला जाणार] याची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यानुसार जागामालकांना महापालिकेने पत्र दिले असून जागा ताब्यात घेवून रस्त्याचे काम सुरु केले आहे.

पुण्याला तीन मंत्री, तरीही प्रश्न सुटेना

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रिपदाचा कार्यभार आहे. त्यांनीच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी निधी देण्याचे जाहीर केले होते. तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘‘माझ्याकडे अर्थखाते आहे, त्यामुळे निधीची काळजी करुन नका मतदान करा,’’ असे अजित पवारांनी जनतेला सांगितले होते. पवार हे शब्द पाळणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र त्यानंतरही निधी न आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.  अजित पवार तसेच चंद्रकांत पाटील राज्यात मंत्री आहेत. त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांच्या रुपात केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे निधी मिळविण्यासाठी एवढी प्रतीक्षा का करावी लागत आहे, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अजित पवार गटाचे आमदार शांत का?

कात्रज-कोंढवा रस्ता हा हडपसर मतदारसंघात येतो. या मतदारसंघाचे असलेले आमदार चेतन तुपे हे अजित पवार गटाचे आहेत. तुपे यांनी रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मात्र त्यांच्याकडून खरंच पाठपुरावा केला जात आहे का, असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाकडून १३९ कोटी रुपये महापालिकेला मिळणार आहेत. तसा शासन आदेश आला आहे. मात्र अद्याप पैसे आलेले नाहीत. लवकरच पैसे मिळणार आहेत. भूसंपादन केलेल्या जागेवर तत्काळ रस्ता तयार करण्यात आला आहे. सध्या रस्त्याचे काम थांबले आहे.

 - अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख, पुणे महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest