पुण्यात तीन चप्पलचोर अटकेत
सीविक मिरर ब्यूरो
पुण्यात चप्पल चोरल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या खडकी भागातील एका दुकानातून तब्बल ५५ चप्पल आणि बूटजोड चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन जणांनी मिळून तब्बल ३० ते ४० हजार रुपयांचे चपलांचे जोड लंपास केले आहेत. यात ४० मेन्स शूज, तर १५ लेडीज चपला आहेत. या प्रकरणी 'सीसीटीव्ही'च्या मदतीने तीन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी हरेश आहुजा यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी सागर चांदणे, आकाश कपूर, अरबाज शेख यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आहुजा यांचे खडकी बाजार भागात चपलेचे गोदाम आहे. शनिवारी गोदाम बंद केल्यानंतर रात्री या तीन तरुणांनी गोदामाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि हाताला दिसेल ते चोरले. यात एकूण ५५ चप्पलजोड आणि काही बूटजोड चोरून ते पसार झाले.
अशिक्षित असल्यामुळे या तरुणांनी उदरनिर्वाहासाठी किंवा दारूसारख्या व्यसनासाठी ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे. खडकी पोलीस ठाण्यात संबंधित तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 'सीसीटीव्ही'मध्ये कैद झाली आहे. आपल्या दुकानात चोरी झाल्याचे आहुजा यांच्या लक्षात येताच त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आहुजा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. 'सीसीटीव्ही' फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान तिघांना अटक करण्यात आली.