नव्या टर्मिनल इमारतीत असणार ३४ चेक-इन काऊंटर
पुणे विमानतळावर वर्धित क्षमता आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह सुरू असलेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम लवकरच पुर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत सप्टेंबरमध्ये प्रवाशांसाठी खुली केली जाऊ शकते. मात्र, या इमारतीमध्ये ३४ चेक-इन काऊंटर असल्याने प्रवाशांच्या लांबच-लांब रांगा लागण्याची शक्यता आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत जागतिक दर्जाच्या सुविधांसह सुसह्य असेल. या इमारतमध्ये ५ पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज, ३४ चेक-इन काउंटर आणि इन-लाइन बॅगेज हाताळणी प्रणाली असेल.
या विमानतळाच्या मध्यवर्ती इमारती वातानुकूलित असणार आहेत. F&B आणि रिटेल आउटलेट्ससाठी २७००० चौरस फूट जागा प्रवाशांच्या अल्पोपहारासाठी असेल. याशिवाय प्रवाशांना आराम करण्यासाठी देखील इतर सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
अधिकाऱ्यांच्या मते, नवीन इमारत सप्टेंबर २०२३ पर्यंत सेवेत येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ४७५ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. पुणे विमानतळाची ही इमारत आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याने या इमारतीमध्ये ४-स्टार GRIHA रेटिंगसह ऊर्जा-कार्यक्षमतेसह व्यवस्था पुरवण्यात येणार आहे.