संग्रहित छायाचित्र
अनुसूचित जातीसाठी पुणे शहराच्या हद्दीतील एकमेव राखीव मतदारसंघ असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ४७.८३ मतदारांनी बुधवारी (दि. २०) मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले. महायुतीतर्फे वर्तमान आमदार भाजपचे सुनील कांबळे आणि महाविकास आघाडीतर्फे रिंगणात असलेले काॅंग्रेसचे उमेदवार रमेश बागवे या दोघांकडूनही विजयाचे दावे करण्यात आले.
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सकाळपासून मतदारांनी गर्दी केली होती. दुपारी १२ ते ३ दरम्यान गर्दी ओसरली, पुन्हा ३ नंतर सहा वाजेपर्यंत गर्दी उसळली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४७.८३ टक्के मतदान पार पडले होते. यावेळी कॅन्टोन्मेंटमधून पुन्हा भाजपचे आमदार सुनील कांबळे बाजी मारणार की मतदार यंदा भाकरी फिरवून काॅंग्रेसच्या रमेश बागवे यांना संधी देणार, याबाबत उत्सुकता आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट हा पुणे लष्कर, भवानी पेठ, टिंबर मार्केट, राजेवाडी, लोहीया नगर, मंगळवार पेठ, पुणे स्टेशन, ताडीवाला रस्ता, बंडगार्डन रस्ता, ससून रस्ता, भीमपुरा, शिवाजी मार्केट, धोबी घाट, गणेश पेठ, नाना पेठ, पूलगेट, घोरपडी गावठाण इत्यादी ठिकाणी मतदारांचा उत्साह दिसून आला. सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत ५.५३ टक्के, नऊ ते दुपारी १२ वाजेपर्यंत १४.१२ टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत २५.४० टक्के, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४७.८३ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी सहानंतर रात्री उशिरा पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची लगबग
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुतीतील घटक पक्षांसह वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, स्वराज्य पक्षासह अपक्ष उमेदवारांचे समर्थकांची लगबग सुरू होती. दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रांवर नेआण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक महिलांसह गरोदर महिलांनीदेखील उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्वच मतदान केंद्रांच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी बदललेल्या मार्गांवर पोलिसांकडून वाहतूक नियंत्रण सुरू होते. एकंदरित विधानसभा मतदारसंघाला छावणीचे स्वरुप आले होते.
दलित, मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी, ज्यू मतदारांचा उत्साह
पुणे लष्कर परिसरामध्ये वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक मतदारांनीदेखील उत्साहात मतदान केले. दलित, मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी, ज्यूधर्मीय मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत रांगा लावून मतदान केल्याचे निदर्शनास आले.
संवेदनशील मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार नाही
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील काही संवेदनशील मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. मतदार यादीतील नावे न सापडणे, मतदान केंद्र बदलल्यामुले काही काळ गोंधळ आणि तणावाची परिस्थिती होती. काही मतदान केंद्रांवर मॉक पोल दरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडले होते. परंतु मतदानाच्या वेळेत सुरळीत मतदान पार पडले.
मतदारयादीतून अनेक नावे गायब, मतदारांना त्रास
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतदेखील अनेक मतदारांची नावे गायब झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे मयत उमेदवारांची नावे मात्र यादीत होती. वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्यांची नावे गायब असल्याने मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरावरील पक्षाच्या बूथवर स्लीप घेण्यासाठी आलेल्या मतदारांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. काही मतदारांची नावे, फोटो चुकल्याचेदेखील निदर्शनास आले. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.