संग्रहित छायाचित्र
महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विरुद्ध महायुतीचे हेमंत रासने अशी लक्षवेधी लढत असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात आपला आमदार निवडण्यासाठी ५४.९१ टक्के मतदारांनी मतदान केले.
शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या कसब्यात बुधवारी (दि. २०) सकाळपासूनच मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. सकाळी सर्वत्र गर्दी पहायला मिळाली. दुपारी गर्दी ओसरल्याचे चित्र होते. परंतु दुपारी तीननंतर पुन्हा गर्दी वाढली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५४.९१ टक्के मतदान झाले. त्यानंतरदेखील मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर लांब रांगा दिसून आल्या. एकदंरित मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
कसबा विधानसभा मतदारसंघातील मध्यपेठांमध्ये सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते. उत्साही मतदारांनी सकाळी ऊन वाढण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यास प्राधान्य दिले. कसब्यात नूमवि शाळा, आरसीएम स्कूल, भारत स्कूल आदी ठिकाणी सकाळपासून रांगा लागल्या होत्या. नारायण पेठेतील वा. ब. गोगटे प्रशालेत ३१ क्रमांकाचे मशीन काहीवेळ बंद पडले होते. पण नंतर ते सुरू झाले. मॉक पोलिंगनंतर ॲड्रेस टॅग व्यवस्थित बांधले न गेल्याने ते बंद पडले होते. ते परत व्यवस्थित केल्यावर मतदान प्रक्रिया ७ वाजून २० मिनिटांनी सुरू झाली. कागदीपुरा, गणेश पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, मोमीनपुरा, गुरूवार पेठ, गंज पेठ, भवानी पेठ, पत्र्याची चाळ, रामोशी गेट, रास्ता पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, कस्तुरी चौक, दारुवाला पुल आदी ठिकाणी मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला.
कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी पत्नीसमवेत थोरले बाजीराव पथावरील नूतन मराठी विद्यालयात मतदान केले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी लोहिया शाळेमध्ये सपत्नीक मतदान केले. नारायण पेठेतील कन्याशाळा येथे ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करण्यासाठी रांग लावली होती.
दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी कार्यकर्त्यांची लगबग
कसबा मतदारसंघात मध्यवर्ती पेठांमध्ये चौकांमध्ये तंबू, छत्र्या टाकून बूथ थाटले होते. ज्येष्ठ नागरिक, महिलांची संख्या लक्षणीय होती. मतदारांना इलेक्ट्रॉनिक मशीनवर स्लीप काढून दिले होते. मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरावर विविध वाहनांमध्ये कार्यकर्ते दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सेवा देत असल्याचे दिसून आले. नाश्ता, जेवणाची पाकीटे, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले जात होते. मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेतली जात होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा यासाठी तैनात करण्यात आला होता.
मोबाईलबंदीमुळे सेल्फीप्रेमींचा हिरमोड
सर्वच मतदारकेंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली होती. प्रसारमाध्यमांनादेखील प्रवेशास मनाई होती. त्यामुळे नवमतदारांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सेल्फी घेता आला नाही. त्यामुळे सेल्फीप्रेमींचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील सर्वात लहान मतदारसंघात कोण जिंकणार?
जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड मतदारसंघात असून, ही संख्या ६ लाख ६३ हजार ६२२ इतकी आहे. सर्वांत कमी २ लाख ८३ हजार ६३५ मतदार कसबा पेठ मतदारसंघात आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दिवंगत मुक्ता टिळक तर त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना कसबावासियांनी आपले प्रतिनिधी म्हणून संधी दिली. या पार्श्वभूमीवर कमी मतदार असलेल्या या मतदारसंघात यावेळी कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागून आहे.