संग्रहित छायाचित्र
प्रशासन आणि सर्व उमेदवारांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५०.४६ टक्के मतदान झाले. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे, महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार आणि वर्तमान आमदार सुनील टिंगरे तसेच बहुजन समाज पक्षाचे डॉ. हुलगेश चलवादी यांनी विजयाचे दावे केले असले तरी नक्की कोण जिंकणार याबाबत उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात बुधवारी (दि. २०) सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत ६.३७ टक्के मतदान झाले. ११ वाजेपर्यंत १५.४८ टक्के, १ वाजेपर्यंत २६.६८ टक्के, ३ वाजेपर्यंत ३८.८३ टक्के मतदान झाले. दुपारी तीननंतर मतदारांची गर्दी वाढली. ५ वाजेपर्यंत ५०.४६ टक्के मतदान झाले.
वडगाव शेरीत एकूण
५ लाख ३ हजार ५३९ मतदार आहेत. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उमेदवारांनी आटोकाट प्रयत्न केल्याचे दिसून आले. मतदारांनी कोणाच्या पारड्यात मते टाकली, हे आता शनिवारी (दि. २३) निवडणुकीच्या निकाला दिवशीच समजणार आहे.
वडगाव शेरी मतदार संघात कोण जिंकणार, याची शहरात चांगलीच चर्चा रंगली. वडगाव शेरीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून आहे. महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) सुनील टिंगरे आणि माजी आमदार असलेले महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे यांच्यात थेट लढत होत आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रतिष्ठेची ही लढाई असल्याने दोघांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. दोन्ही उमेदवारांकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. याबरोबरच बसपतर्फे डाॅ. हुलगेश चलवादी रिंगणात आहेत.
मतदानासाठी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. मतदान केंद्र सुरू होण्यापूर्वी मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याचे दिसून आले. सकाळी सात वाजता मतदान करण्याची अनेक मतदारांची इच्छा असते. त्यामुळे मतदान केंद्र सुरु होण्यापूर्वीच मतदान केंद्राबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
वडगाव शेरीतील प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान केंद्राच्या २०० मीटर अंतरावर नो पार्किंग झोन करण्यात आला होता. मात्र अनेक ठिकाणी या नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी केंद्रांची पाहणी करण्यात येत होती. त्यावेळी मात्र कार्यकर्त्यांची धावपळ उडताना दिसून आली. मतदार केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानंतरही अनेकांनी मोबाईल सोबत ठेवले होते. मात्र मतदान खोलीत जाताना मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. मोबाईल मतदान खोलीच्या बाहेर ठेवल्यानंतरच प्रवेश दिला जात होता. त्यावरून अनेक ठिकाणी किरकोळ स्वरुपाचे वाद झाले.
मतदारांचा उत्साह
वडगाव शेरीतील प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. मतदार स्वत:हून मतदानासाठी बाहेर पडताना यावेळी दिसून आले. निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्राच्या बाहेर बूथ लावण्यात आले होते. त्यावेळीदेखील छुपा प्रचार करण्यात आला. मतदारांच्या घरी जावून कार्यकर्त्यांकडून मतदान करण्याचे आवाहन केले जात होते. प्रत्येकाने आपआपल्या भागाची जाबबदारी घेतली होती. त्यामुळे मतदारांना घराबाहेर काढून त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविणे आणि पुन्हा घरी सोडण्याची योग्य काळजी घेतली जात होती. त्यामुळे मतदार मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडताना दिसून आले.
दुसरीच व्यक्ती करुन गेली मतदान
एकाच नावाच्या दोन व्यक्ती असू शकतात. मात्र त्यांचे फोटो वेगळे असतात. त्यानंतरहीदेखील एका व्यक्तीच्या नावावर दुसराच मतदान करुन गेल्याचे प्रकार वडगाव शेरी मतदारसंघात घडल्याचे दिसून आले. जर दुसरा कोणीतरी व्यक्ती आपल्या नावावर मतदान करून गेला असेल तरी आपली ओळख पटवून मतदान करता येते, पण त्यासाठी अधिकाऱ्याची परवानगी लागते. विश्रांतवाडीमध्ये असाच प्रकार घडला. संबंधित अधिकाऱ्याच्या परवानगीने मतदान करता आले असते. परंतु डॉ. अतुल गानला मतदानापासून वंचित राहिले. यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘लोकसभा निवडणुकीवेळी दुसरेच कुणीतरी मतदान करून गेले होते. त्यावेळी कागदावर मतदान करुन घेतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. विधानसभेलाही असेच घडले. एकाच नावाच्या दोन काय अनेक व्यक्ती असतात. परंतु त्यांचा फोटो एकच कसा असू शकतो, असा प्रश्न उपस्थित करुन निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत मतदार संतोष निंबाळकर यांनी नाराजी व्यक्ती केली.
ऐनवेळी मतदान केंद्र बदलल्याचा अनुभव
बहुतेक मतदारांना लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी घराजवळील मतदान केंद्र मिळाले होते. परंतु यावेळी विधानसभेला मतदान केंद्र बदलल्याचा अनुभव अनेकांना आला. खराडीत थिटे वस्ती येथील केंद्रावर नेहमी येत असलेले नाव यावेळी येरवड्यातील केंद्रावर होते. यावेळी आपली नावे दुसऱ्या केंद्रावर कशी गेली, असा प्रश्न अनेक मतदारांना पडला होता. अनेक मतदारांचे नाव घरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मतदान केंद्रावर गेल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला.