संग्रहित छायाचित्र
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी सर्वांत कमी म्हणजे ४४.९५ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदारांच्या या थंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगरमध्ये पुन्हा भाजपचे वर्तमान आमदार सिद्धार्थ शिरोळे बाजी मारणार की काँग्रेसचे दत्ता बहिरट यावेळी चमत्कार करणार, याबाबत उत्सुकता आहे. अपक्ष म्हणून लढलेले काँग्रेसचे बंडखोर मनीष आनंद कोणाचे नुकसान करणार, यावर मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेची सुरुवात सकाळी सात वाजता झाली. शिवाजीनगर मतदार संघातील रहिवाशांनी मतदानासाठी उत्साह दिसला. सकाळपासूनच मतदानासाठी नागरिकांनी उपस्थिती लावल्याचे पहायला मिळाले. आपटे रस्त्यापासून भांडारकर रोड आणि शिवाजीनगरपर्यंतच्या विविध भागांतील नागरिक सकाळपासूनच मतदान केंद्रांवर दाखल झाले होते.
वृद्धांपासून ते तरुणांपर्यंतच्या मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. शिवाजीनगरमधील नागरिकांमध्ये विशेषतः मतदानाबाबत मोठा उत्साह जाणवला. मात्र, सकाळच्या सत्रानंतर दुपारच्या उन्हामुळे मतदानाचा वेग काहीसा मंदावला. सकाळी दहा वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी वाढली होती, परंतु उन्हाचा कडाका वाढल्याने अनेकांनी दुपारनंतर ऊन थंडावल्यावर मतदानासाठी येणे पसंत केले.
शिवाजीनगरमधील पहिली मतदार प्राजक्ता कोंडे यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले, ‘‘दुपारच्या गर्दीपासून बचाव करण्यासाठी लवकर येण्याचा निर्णय घेतला. सुट्टी असली तरी सकाळीच मतदान करायचं ठरवलं होतं, जेणेकरून उर्वरित दिवसाची कामं निर्विघ्नपणे पार पाडता येतील. गेल्या तीन निवडणुकांपासून मी नेहमीच लवकर मतदान करत आले आहे आणि मला हे खूप सोयीचं वाटतं.’’
शिवाजीनगरमध्ये सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी काही मतदारांनी वाढलेल्या प्रतीक्षा वेळेबद्दल चिंता व्यक्त केली. दुपारनंतर रांगा मोठ्या झाल्या. परंतु बहुतेकांनी लोकशाही प्रक्रियेसाठी संयम ठेवण्याचे महत्त्व समजून घेतले. किरकोळ प्रसंग वगळता निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली. मात्र, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इतर मतदारसंघाच्या तुलनेत मतदारांचा उत्साह कमी प्रमाणात दिसून आला.
माॅर्निंग वाॅकवरून थेट मतदानाला
लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या मतदान केंद्रावर मतदार सकाळी साडेसहा वाजताच पोहोचल्याचे पहायला मिळाले. सकाळच्या सत्रात झालेल्या मतदानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक नागरिकांनी त्यांच्या नियमित मॉर्निंग वॉकच्या वेळापत्रकात मतदान करून घेतले. विशेषतः डेक्कन भागात, सकाळी फिरायला गेलेले मतदार घरी परतताना मतदान केंद्रावर थांबले आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.