Hadapsar Assembly Constituency : सकाळनंतर वाढली मतदानाची लगबग

हडपसर विधानसभा मतदारसंघात यंदा सायंकाळी ५ पर्यंत ४५.०२ टक्के मतदान झाले. महायुतीचे चेतन तुपे जिंकणार की महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप, याबाबत मतदारांमध्ये चर्चा रंगली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Thu, 21 Nov 2024
  • 12:20 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महायुतीचे चेतन तुपे, महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप यांच्यापैकी बाजी कोण मारणार?

हडपसर विधानसभा मतदारसंघात यंदा सायंकाळी ५ पर्यंत ४५.०२ टक्के  मतदान झाले. महायुतीचे चेतन तुपे जिंकणार की महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप, याबाबत मतदारांमध्ये चर्चा रंगली आहे. 

पहिल्या टप्प्यात म्हणजे सकाळी ७ ते ९ या वेळेत अवघे ४.४५ टक्के मतदान झाले. संथ गतीने मतदानाची सुरुवात झाल्याने मतदानाचा टक्का वाढवण्याचे आव्हान प्रशासनासह उमेदवारांपुढे होते. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४५.०२ टक्क्यांवर जावून पोहोचली. तर दिवसभरात एकूण ४५.०२ टक्के मतदान झाले. पुणे शहरातील सर्वात मोठा मतदारसंघ असून हडपसर मतदारसंघ ओळखला जातो. या मतदारसंघात ६ लाख २५ हजार ६७५ मतदार आहेत.

हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे. परंतु बंडखोरी तसेच मनसेने उमेदवार उभा केल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये धाकधुक वाढली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघात ४७.२३ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनासह उमेदवारांनी कंबर कसली होती. हडपसरच्या विद्यमान आमदार चेतन तुपे (राष्ट्रवादी) आणि  राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांच्यात थेट लढत होत आहे. तुपे यांनी २०१९ मध्ये भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांना पराभूत केले होते. तर २०१४ मध्ये भाजपाच्या योगेश टिळेकर यांनी  शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांना परावभावाची धुळ चारली होती. त्यामुळे एकाच व्यक्तीला दोन वेळा आमदार होण्याची संधी हडपसर मतदारसंघात अद्यापपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे तुपे की जगताप याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  साईनाथ बाबर, तर अपक्ष म्हणून गंगाधर बधे देखील रिंगणात उतरले. महाविकास आघाडीचे माजी आमदार महादेव बाबर यांना उमेदवारी दिली जाणार होती. परंतु ही जागा राष्ट्रवादीला दिल्याने ते नाराज झाले होते. अपक्ष उमेदवार बधे यांना त्यांनी पाठिंबा दिल्याचे बोलले गेले.  याचा फटका नेमका कोणाला हे समोर येईलच.

हडपसर भागात बहुजन मतदार संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मराठा, माळी, मुस्लिम समाज मतदारांची संख्या मोठी आहे. ज्या उमेदवाराला या समाजांचा पाठिंबा मिळतो. तो उमेदवार विजयी होतो, असा दावा केला जातो. त्यामुळे या समाजाचे कोणाच्या पारड्यात मतदान पडणार, हे आता २३ तारखेलाच समजणार आहे. यापूर्वी शरद पवार, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह अनेक जेष्ठ नेत्यांच्या सभा जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आल्या. तुपे यांच्या प्रचारात योगेश टिळेकर आणि महायुतीचे नेते सहभागी झाले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांच्यासाठी जाहीर सभा घेतली, तर गंगाधर बधे यांच्या प्रचारात माजी आमदार महादेव बाबर विशेष सक्रिय राहिल्याचे दिसून आले. हडपसरच्या उमेदवारांसाठी मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्याने मतदारांवर कितपत प्रभाव पडला अन कोणाच्या बाजूने मतदार कौल देणार याची उत्सुकता मतदारांना लागली आहे. हडपसरमध्ये आपेक्षित मतदार टक्का वाढला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांमध्ये धाकधुक वाढली आहे.

मतदारांना मतदान केंद्रावर आणण्याची लगबग

हडपसर भागातील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेवून जाण्याचे आव्हान उमेदवारांपुढे होते. त्यामुळे मतदान करण्याचे आवाहन सातत्याने केले जाते होते. कार्यकर्त्यांनी घरोघरी मतदारांशी साद घालत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत मतदान केंद्रापर्यंत घेवून जात असल्याचे दिसून आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest