Pune : हाॅटेल-पब-बारमधील दणदणाट थांबला; रात्री दीडनंतर पोलिसी मात्रा लागू

पुण्यातील हॉटेल, पब (Hotel, Pub) आणि बार (Bar) रात्री दीड वाजता बंद म्हणजे बंद, असा इशारा पुण्याचे नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्यानंतर त्याची मात्रा कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, मुंढवा आणि खराडी भागात लागू झाली आहे.

Pune pubs

हाॅटेल-पब-बारमधील दणदणाट थांबला; रात्री दीडनंतर पोलिसी मात्रा लागू

कोरेगाव पार्क, मुंढवा, कल्याणीनगर, खराडी भागात शुकशुकाट

पुण्यातील हॉटेल, पब (Hotel, Pub) आणि बार (Bar) रात्री दीड वाजता बंद म्हणजे बंद, असा इशारा पुण्याचे नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्यानंतर त्याची मात्रा कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, मुंढवा आणि खराडी भागात लागू झाली आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार या भागात रात्री दीड वाजण्यापूर्वीच हॉटेल, पब, बार, क्लब बंद करण्यात येत असल्याचे ‘सीविक मिरर’च्या पाहणीत दिसून आले. (Pune News) 

पुणे शहर पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील स्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे याबाबत कठोर भूमिका जाहीर केली. ‘‘आतापर्यंत जे झाले ते झाले, आता आगीशी खेळू नका,’’ असा सज्जड दम देत रात्री-बेरात्री सुरू असणारे हॉटेल, पब आणि बार रात्री दीडला बंद म्हणजे बंद असतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.  ‘नाईट लाईफ’च्या नावाखाली रात्री-बेरात्री सुरू राहणाऱ्या हॉटेल, पब आणि बारमध्ये पहाटेपर्यंत मद्यविक्री सुरू असते. अनेक पबमध्ये सरकारी नियमांचे उल्लंघन केले जाते. स्पीकरवर जोरजोरात गाणी वाजवली जातात. त्याचा स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. त्यामुळे शहरातील सर्व ‘पब-बार’ रात्री दीड म्हणजे दीड वाजता बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. शासनाने ठरवून दिलेली वेळ पाळण्यात यावी. अन्यथा कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी बजावले आहे. याचा योग्य तो परिणाम कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, मुंढवा आणि खराडी भागात दिसून आला.

आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्याला चार दिवसही उलटलेले नसताना बाणेर, बालेवाडी भागात पब आणि बार रात्री दीडनंतरही सुरू असल्याचे ‘सीविक मिरर’च्या पाहणीत दिसून आले होते. त्यानंतर ‘सीविक मिरर’ने कोरेगाव, मुंढवा, कल्याणीनगर आणि खराडी परिसरात शुक्रवारी आणि शनिवारी (दि. ९ आणि १०) या दोन दिवशी पाहणी केली. यात रात्री १२.४५ वाजता पोलिसांकडून हॉटेलची तपासणी करण्यात येत असल्याचे दिसून आले. साध्या वेशातील पोलीस हॉटेलमध्ये शिरून आढावा घेत होते. तसेच १.३० पूर्वी हॉटेल बंद करण्याच्या सूचना देत होते. 

त्यामुळे हॉटेलचालकांची चांगली धावपळ होत होती. गाण्याच्या तालावर थिरकणाऱ्यांना आणि मस्त रंगात आलेल्या मद्यपींना बाहेर जाण्याचे सांगावे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला होता. प्रत्येक टेबलवर जाऊन ‘‘पोलिसांच्या सूचनेनुसार हॉटेल दीड वाजता बंद होणार आहे. त्यामुळे आपल्यालादेखील वेळेत हॉटेलच्या बाहेर जावे लागेल,’’ अशी विनंती केली जात होती. काही हॉटेल लकांनी १.०३ वाजता साऊंड सिस्टीम बंद केली. कोणताही ग्राहक नाराजी होऊ नये, याची मात्र काळजी घेतली जात होती.  दरम्यान, पोलिसांचा या परिसरात दोन ते तीन वेळा राऊंड झाला.

खराडीतील रुफ टॉप 'गिल्ट क्लब'ची पाहणी केली असता, या क्लबमधील किचन सेवा रात्री एक वाजताच बंद करण्यात आली होती. मात्र साऊंड सिस्टीम दीड वाजेपर्यंत सुरु होती. रात्री एक वाजण्यापूर्वी ज्यांनी ऑर्डर केली होती, असे ग्राहक दीड वाजल्यानंतरही जेवणाचा आस्वाद घेत होते. त्यानंतर मात्र हॉटेलचालकाने सर्व ग्राहकांना बाहेर जाण्यास सांगितले. कोरेगाव पार्क येथील ‘ग्लिंट बाय प्लंज’ या पबमध्ये साऊंड सिस्टीम रात्री एक वाजताच बंद करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र मद्यप्रेमींनी केलेल्या मागणीनुसार रात्री दीडनंतरही लिकर सेवा दिली गेली. त्यानंतर मात्र हॉटेल बंद झाल्याचे सांगण्यात आले.

के दिल अभी भरा नहीं...

आठवडाभर केलेल्या कामाचा ताण हालका करण्यासाठी, मौजमस्ती करण्यासाठी तर कोणी खास मैत्रिणीला खूश करण्यासाठी  हॉटेलमध्ये घेवून आलेला होता. काहीजण मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पबमध्ये आलेले होते. गाण्याच्या तालावर थिरकणाऱ्या पायांना गाणे बंदच होऊ नये, असे वाटत होते. तर मद्यप्राशन करणाऱ्यांना एक ग्लास रिचवताना दुसरा ग्लास भरलेला हवा असतो. रंगात आलेली पार्टी कधी संपेल याला मोजमाप नसते. मात्र पोलीस आयुक्तांनी दिलेल्या दणक्यामुळे पार्टीला वेळेचे बंधन लागले. त्यामुळे रंगात आलेली पार्टी अगदी घड्याळ्याच्या काट्यावर थांबल्यामुळे अनेकांचा रसभंग झाला. निराश मनाने पब, हॉटेलमधून बाहेर निघताना ‘के दिल अभी भरा नहीं...’ अशी भावना बहुतेक सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. 

पोलीस विभागाकडून रात्री उशिरापर्यंत सुरु असेलेल्या हॉटेल, पब आणि क्लबवर नजर ठेवण्यासाठी पोलीस पथके नेमण्यात आली आहेत. पथकाच्या माध्यमातून हॉटेलचालकांना सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे वेळेआधीच हॉटेल बंद होत आहेत. सामाजिक सुरक्षा विभागाकडूनदेखील हॉटेल्सवर नजर ठेवली जात आहे. कोणतेही हॉटेल रात्री दीडनंतर सुरु असल्याचे दिसून आले तर त्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशांचे पोलीस अधिकारी काटेकोर पालन करीत आहेत.

- अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा), पुणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest