भूगाव तलावाचा हरवला गोडवा!

खडकवासला धरणापाठोपाठ आता जिल्ह्यातील छोटे मोठे तलावही प्रदूषित होऊ लागले आहेत. त्यातील एक प्रकार समोर आला असून भूगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जलाशय प्रदूषित झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड-एमपीसीबी) भूगाव ग्रामपंचायतीला पत्र पाठवित कारवाई करण्याची सूचना केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sun, 10 Sep 2023
  • 02:07 pm
Bhugaon Lake

Bhugaon Lake : भूगाव तलावाचा हरवला गोडवा!

परिसरातील सांडपाणी तलावात सोडल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाठवले भूगाव ग्रामपंचायतीला कारवाईचे पत्र; अतिक्रमणाबद्दल पाटबंधारेने बजावल्या ग्रामपंचायत, हॉटेल चालक, जागा मालकांना नोटिसा

खडकवासला धरणापाठोपाठ आता जिल्ह्यातील छोटे मोठे तलावही प्रदूषित होऊ लागले आहेत. त्यातील एक प्रकार समोर आला असून भूगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जलाशय प्रदूषित झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड-एमपीसीबी) भूगाव ग्रामपंचायतीला पत्र पाठवित कारवाई करण्याची सूचना केली आहे. भूगाव तलावाच्या आसपास हॉटेल, रेस्टॉरंट आणि विविध आस्थापनांमधून सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होत आहे. तसेच काही हॉटेल चालक व जागा मालकांनी अतिक्रमण केल्यामुळे कोथरूड पाटबंधारे शाखेने ग्रामपंचायत, हॉटेल चालक, जागा मालकांना नोटिसा बजावल्या आहेत.

भूगाव तलाव हा खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येतो. या विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवत भूगाव तलावात सोडण्यात येत असलेल्या दूषित पाण्याबाबत कळवले होते. त्यानंतर कोथरूड पाटबंधारे शाखेनेही एमपीसीबीला या संदर्भात पत्र दिले होते. कोथरूड पाटबंधारे शाखाधिकारी कार्यालयाने पाठविलेल्या पत्रामध्ये या ठिकाणी विविध हॉटेल व्यावसायिकांकडून तलावात सांडपाणी सोडले जात असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर एमपीसीबीने भूगाव ग्रामपंचायतीला याबाबत पत्र पाठवित कारवाईच्या सूचना केल्या होत्या. यासंदर्भात कारवाईचे अधिकार ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदारांना असल्याचे एमपीसीबीने विशेषत: नमूद केले होते.

दरम्यान, कोथरूड पाटबंधारे विभागानेही काही अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या होत्या. त्यामध्ये थेट जलाशयातच अतिक्रमण केल्याचे नमूद केले आहे. अनेकांनी तलावात बेकायदा मोटारी टाकून पाण्याचा उपसा सुरू केला आहे. काही जणांना तलावात दूषित पाणी सोडल्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. 'हा तलाव खडकवासला पाटबंधारे विभागाच्या मालकीचा आहे. या तलावामधून भूगाव आणि भुकूम या दोन्ही गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. भुकूम हद्दीतील व्यावसायिक, सदनिकाधारक, सोसायट्यांचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर तलावात सोडले जात आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होत आहे. या दूषित पाण्यामुळे भुकूम आणि भूगावच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अनेक आजार उद्भवण्यास सुरुवात झाली असून रोगराई वाढू लागली आहे. त्यामुळे तलावात सांडपाणी सोडणे तत्काळ बंद करावे. अन्यथा कारवाई केली जाईल' अशा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.  

त्यांना महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ चे उल्लंघन केल्याप्रकरणी अधिनियम ९३, ९४, ९५, ९६ नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. या पत्राची प्रत पीएमआरडीएला देखील पाठविण्यात आली होती.

भूगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहात आहेत. एकेकाळी निसर्गरम्य परिसर असलेल्या आणि वर्षासहल, भात शेतीसाठी प्रख्यात असलेल्या भूगावमध्ये आजमितीस टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. वाढत्या नागरीकरणासोबतच या ठिकाणी मोठ मोठी हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि रिसॉर्ट्सदेखील उभी राहिली आहेत. विशेषत: तलाव परिसरात अशा प्रकारची अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर उभी राहिली आहेत. त्यावर कारवाई करण्याचे धाडस महापालिका, पीएमआरडीए दाखवीत नाही. राजकीय दबावापोटी प्रशासन बोटचेपी भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
तपासणीसाठी नमुने पाठवले 

भूगाव तलावामध्ये होणारे जलप्रदूषण भविष्यात मोठी समस्या निर्माण करणार आहे. या गावाला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होणार आहे. या तलावात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचे आणि दूषित पाण्याचे नमुने खडकवासला पाटबंधारे विभागाने घेतले असून हे नमुने तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आले आहेत. या संदर्भात पाटबंधारे विभागाने महापालिका आणि पीएमआरडीएकडे कारवाईची मागणी देखील केली होती.

भूगावच्या तलावातही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. या ठिकाणी असलेली हॉटेल, रेस्टॉरंट्स, विविध आस्थापना, काही बांधकामातून दूषित पाणी तलावात सोडले जात असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. त्यामुळे दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविले आहेत.

- श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला खडकवासला पाटबंधारे विभाग, कोथरूड पाटबंधारे शाखा यांच्या कार्यालयांकडून पत्र प्राप्त झाले होते. भूगाव तलावात होणाऱ्या जलप्रदूषणाबाबत हे पत्र होते. त्याअनुषंगाने आम्ही भूगाव ग्रामपंचायतीला पत्र दिले असून ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदारांना  अधिकाराप्रमाणे कारवाई करण्याबाबत पत्र पाठविले आहे. कारवाईचा अधिकार ग्रामपंचायतीचा आहे.

- व्ही. व्ही. किल्लेदार,  उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest