पोलिसांच्या हद्दीच्या वादाने केली 'हद्द', मृतदेह आपल्या हद्दीबाहेर जाईपर्यंत पोलिसांनी बघितली वाट
डेंगळे पुलाजवळील मुळा-मुठा नदीपात्रातून वाहात जाणाऱ्या मृतदेहाबाबत जागरूक नागरिकांनी कळवूनदेखील डेक्कन पोलिसांनी हा मृतदेह आपल्या हद्दीबाहेर वाहून जाईपर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या असंवेदनशीलतेवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
मुळा-मुठा नदीपात्रात सोमवारी (दि. २) दुपारी तीनच्या सुमारास एका अनोळखी नागरिकाचा मृतदेह दिसल्याने खळबळ उडाली. नदीपात्र परिसरातून जाताना एका नागरिकाला हा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधाशोध केली. मात्र, तासाभरात मृतदेह दिसेनासा झाला. याबाबत पोलिसांना कळवताच मृतदेह पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बाहेर गेल्याने आमचा संबंध नसल्याचे सांगत घटनास्थळी धाव घेणे टाळल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
पांढऱ्या रंगाचे अंगावर कपडे असलेल्या अवस्थेतील एक मृतदेह डेंगळे पुलाजवळ मुळा-मुठा नदीपात्रात तरंगत होता. परिसरातून जाणाऱ्या एका नागरिकाला तो दिसून आला. मृतदेह दिसल्याने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. त्यानंतर संबंधित नागरिकाने तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. लागलीच ६ ते ७ जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केला. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पुणे आणि परिसरात पाऊस पडत आहे. त्यामुळे, वाहते पाणी असल्याने मृतदेह नदीपात्रात पुढे सरकला होता. तासाभरात साधारण डेंगळे पुलापासून भिडे पुलापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधाशोध केली. बघेदेखील मृतदेह पाहण्यासाठी नदीकाठाने गर्दी करत होते. परंतु, कालांतराने मृतदेह दिसेनासा झाला.
या दरम्यान, डेक्कन पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याला घटनेची माहिती देण्यात आली. मोबाईल फोनवर संवाद साधताना मृतदेहाबद्दल अधिकाऱ्याकडून विचारणा करण्यात आली. तोपर्यंत मृतदेह भिडे पुलाच्या पुढे गेल्याची बघ्यांमध्ये चर्चा होती. भिडे पुलाच्या पुढे गेल्याचे कळताच संबंधित अधिकाऱ्याने, “आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मृतदेह पुढे गेला आहे. यामुळे त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, जाऊ द्या”, असे सांगत घटनास्थळावर धाव घेणे टाळल्याचा विचित्र प्रकार समोर आला.
मृतदेहाची कुणकुण लागताच बघ्यांनी नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड गर्दी केली होती. मृतदेहाचा फोटो घेण्यात आणि सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. यामुळे काही काळ वाहतूक कोंडीदेखील झाली. मात्र, मृतदेहाबाबत विचारणा करताच आम्ही मृतहेद पाहिला, अशी काही जणांनी प्रतिक्रिया दिली. तर पोलीस कारवाईच्या भीतीने काहींनी मृतदेहाबाबत बोलणे टाळले.
अग्निशमन दलाचेही तोंडावर बोट
‘‘आम्ही जवळपास तासभर मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाती लागला नाही. अनेक जण मृतदेह बघितलाच नाही, असे सांगत आहेत. आम्हालादेखील कोणताही मृतदेह सापडलेला नाही. जर मृतदेहच सापडला नाही तर आम्ही प्रतिक्रिया कशी देणार,’’ ? असे सांगत अग्निशमन दलाच्या जवानांनी या विषयावर ‘सीविक मिरर’ शी बोलणे टाळले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.