पूर्वीच्या पिढीच्या आव्हानांपेक्षा सध्याच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांसमोर खूप वेगळी आव्हाने - डॉ. विजयकुमार सारस्वत
पुणे,दि. ५: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकी, विज्ञान या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबरोबर एकंदरीत वैज्ञानिकतेसह सामाजिक विज्ञानाच्या मार्गांचा विकास करण्यासाठी आपले क्षेत्र विस्तारित केले असून याचा अभिमान आहे. तसेच अनुभवी शिक्षक सदस्य विशेषत: सौर ऊर्जा अनुप्रयोग, कृषी जैवतंत्रज्ञान आणि मानवी आरोग्य सेवा सोल्यूशन्स या क्षेत्रांमध्ये संशोधनासाठी समर्पितपणे योगदान देत आहेत. मला खात्री आहे की SPPU मधील अत्याधुनिक संशोधन सुविधा आणि तेथील प्राध्यापकांचे सक्षम मार्गदर्शन तरुण मनांना मार्गदर्शन करतील आणि भविष्यातील जागतिक आणि राष्ट्रीय प्रयत्नांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना तयार करतील. परंतु सध्याच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांसमोरील आव्हाने पूर्वीच्या पिढीच्या आव्हानांपेक्षा खूप वेगळी आहेत असे नीती आयोगाचे सदस्य तसेच माजी कुलपती, जेएनयू, दिल्ली डॉ. विजयकुमार सारस्वत म्हणाले. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात बोलत होते. विद्यापीठाचा १२५ वा पदवी प्रदान समारंभ आज ५ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय कुमार सारस्वत उपस्थित होते. यांच्यासह व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे, वित्त व लेखा अधिकारी सीएमए चारूशिला गायके, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. (डॉ.) प्रमोद पाटील, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. (डॉ.) यशोधन मिठारे, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. (डॉ.) प्रभाकर देसाई, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. रविंद्र शिंगणापूरकर, श्री. संदिप पालवे, प्राचार्य डॉ. नितिन घोरपडे, श्रीमती ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, प्रा. डॉ. धोंडीराम पवार, श्रीमती बागेश्री मंठाळकर, प्रा. डॉ. संगीता जगताप, श्री. सागर वैद्य आदी उपस्थित होते. या समारंभात ९३,२१९ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली.
पुढे बोलताना, हवामानातील बदल, एक जागतिक संकट, हे मानवजातीच्या नैसर्गिक संसाधनांच्या अनिश्चित वापराचा परिणाम आहे. हवामानाच्या तीव्र घटना जसजशा तीव्र होत जातात, तसतसे शास्त्रज्ञांनी हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी धोरणे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या धोरणांमध्ये नूतनीकरणक्षम उर्जा स्त्रोतांमध्ये संक्रमण, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि हवामान-लवचिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असून भारताने स्वच्छ आणि परवडणारे ऊर्जा तंत्रज्ञान, पर्यावरणास अनुकूल वाहतूक उपाय औद्योगिक पद्धती आणि विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. भविष्यातील ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरणीय स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी हे उपाय महत्त्वपूर्ण आहेत. भारताने नवीकरणीय ऊर्जेमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे, परंतु जीवाश्म इंधनापासून दूर असलेल्या संक्रमणाला गती देण्यासाठी आणखी काही करणे आवश्यक आहे. याशिवाय, शाश्वत औद्योगिक पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये गुंतवणूक केल्याने भारताचा कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत होऊ शकते.
भविष्यातील अर्थव्यवस्था ही पूर्णपणे ज्ञानावर आधारलेली आहे. या बदलाच्या लाटेवर स्वार होऊन २१ व्य शतकात निर्माण होणाऱ्या नव्या संधी व रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये अवगत करण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग असून अध्ययन, अध्यापन, संशोधन, कार्यानुभव, शिक्षणक्रम, अभ्रासक्रम यांत पायाभूत व कालानुरूप बदल करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कटिबद्ध आहे. तसेच भारत हा युवकांचा देश आहे, ही भारताची नवी ओळख सार्थ करण्याचे शिवधनुष्य उचलायचेही आवाहन कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा संक्षिप्त अहवाल उपस्थितांसमोर सादर केला.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ वार्ता’ या पदवीप्रदान विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉ. विजयकुमार सारस्वत यांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना २८ सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठाच्या इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलात झालेल्या या सोहळ्यात ७३ हजार ११३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, १९ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, ९३ विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र, १६५ विद्यार्थ्यांना पीएच.डी., ६१ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी पदविका प्रमाणपत्र मिळाले. या कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषद सदस्य, अधिसभा सदस्य यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्माचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.