व्यापाऱ्यांची फसवणूक करणारा फरार आरोपी पोलीसांच्या ताब्यात
पुण्यातील स्वारगेटसह इतर सहा शहरातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विविध शहरातील तात्पुरत्या स्वरुपात तयार केलेल्या फर्मचा दाखला देऊन व्यापाऱ्यांची फसवणूक करायचा. गेल्या एक वर्षापासून हा आरोपी फरार होता. अखेर स्वारगेट पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
हितेश नानकराम आसवानी (वय ३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेशने नागपूर येथे राधा एंटरप्राइजेस नावाची तात्पुरती फर्म स्थापन केली होती. या फर्मच्या नावाने पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि सांगली या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करत होता. या व्यापाऱ्यांकडून तूप, गोड, बेदाणे, बदाम, सुपारी रवा इत्यादींची खरेदी करुन पहिल्या एक-दोन विवाहाचे पैसे देऊन या व्यापाऱ्यांचा विश्वास जिंकून घ्यायचा. त्यानंतर मोठ्या प्रमाणात माल मागवून पैसे न देता हे आरोपी पसार व्हायचा.
अखेर तपासादरम्यान आरोपी पुण्यातील पिंपळे गुरव येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हितेशला अटक केली. त्याच्यावर कलम ४०६, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीवर पुणे शहरातील स्वारगेट पोलीस स्टेशन, सांगलीतील तासगाव पोलीस स्टेशन, नागपूरमधील लकडगंज नंदनवन व तहसील पोलीस स्टेशनमध्ये ४ असे एकूण ६ फसवणुकीचे व इतर गुन्हे दाखल आहेत.