लोकसभेला धंगेकरांचा प्रचार करतो पण बदल्यात...; ठाकरे गटाची मविआकडे 'ही' मागणी

पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे उमेदवार आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

लोकसभेला धंगेकरांचा प्रचार करतो पण बदल्यात...; ठाकरे गटाची मविआकडे 'ही' मागणी

पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे उमेदवार आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. काहीही झाले तरी धंगेकर यांनी निवडणूक आणण्यासाठी आघाडीकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे मित्रपक्षांना सोबत घेत बैठकांचा धडाका सध्या सुरु आहे. अशाच एका बैठकीत आम्ही लोकसभेला धंगेकरांचा प्रचार करतो, मात्र कसबा विधानसभा मतदार संघ (Kasba Vidhansabha Constituency) आम्हाला द्या, अशी थेट मागणी पुण्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली असल्याचे समोर आले आहे.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी (दि. २७) काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भात दुपारी १२ वाजता शहर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर दुपारी एक वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी आम्ही कसबा विधानसभेला जीवाचे रान करुन प्रचार केला. आताही लोकसभेचा प्रचार करु आणि धंगेकरांना विजय मिळवून देऊ. मात्र विधानसभेच्या निवडणुकीला कसबा मतदारसंघ आम्हाला द्या, अशी थेट मागणी ठाकरे गटाने केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मात्र याबाबत सध्या चर्चा नको म्हणून या विषयावर अधिक बोलणे टाळण्यात आले. त्यानंतर बैठकीतील पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणूक संपण्यापूर्वी ठाकरे गटाने आतापासूनच कसबा मतदारसंघावर दावा केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक कचेरी टाकणे, शहर आणि विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वय समिती तयार करणे, २९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता इंडिया फ्रंट आघाडीतील घटक पक्षांसोबत बैठकीचे आयोजन, पत्रकामध्ये कोणकोणत्या मुद्दांचा समावेश असावा, महाविकास आघाडीचे विधानसभा निहाय निरिक्षक नेमणे तसेच निवडणुकीच्या दृष्टीने विविध कमिट्या तयार करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीत महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, संजय बालगुडे, दत्ता बहिरट, अजित दरेकर, अमीर शेख, त्याचबरोबर शिवसेनेचे विभागप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, कल्पना थोरवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर आदींसह महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपकडून मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे पुण्याची निवडणूक एकतर्फी होईल, असे बोलले जात होते. मात्र जनसामान्यांचा नेता आणि समाजमाध्यमांवर क्रेझ असलेले काॅंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने ही निवडणूक भाजपला सोपी जाणार नसल्याचे बोलले जात आहे. यासोबतच मनसेला रामराम ठोकणारे आणि समाजमाध्यमात प्रसिद्ध असणारे वसंत मोरे यांनीदेखील पुणे लोकसभा निवडणुक थेट होतेच कशी, असे म्हणून निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्यांना आता अपक्ष उमेदवार म्हणूनच अर्ज भरावा लागणार आहे. त्यांचा प्रभाव पुणेकारांवर  कितपत पडतो, हेदेखील पाहावे लागणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest