संग्रहित छायाचित्र
येरवडा कारागृहातील जीवन म्हणजे पैसा फेको, जो चाहे ले लो ! बाहेर १० रुपयाला मिळणारी तंबाखू येथे १०० ला मिळते. प्रत्येक इच्छा येथे पूर्ण होऊ शकते. मात्र, त्यासाठी हाती पैसा असावा लागतो. सभोवती टोळी जमवून कारागृहावर काहीजण जणू राज्य करत असतात. काहीजण गुन्हेगारी सूत्रे कारागृहातून हलवतात. याचा थांगपत्ता ना कारागृह प्रशासनाला असतो ना पोलिसांना.
ज्या कैद्यांकडे पैसे आहेत. त्याला येरवडा कारागृहात चमचमीत जेवण, तंबाखू, सिगारेटच नव्हे तर गांजासारखे अमली पदार्थ सहज मिळतात. याचा पुरवठा करणारी यंत्रणा इतकी सक्षम आहे की, रक्षकापासून ते मंत्रालयापर्यंत त्यांची भक्कम साखळी आहे.
कारागृहात महिन्याला जेवणावरच तीस कोटी खर्च होतो. त्यामुळे वर्षाला कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या कारागृहाचे आर्थिक गणित सर्वसामान्यांच्या समजशक्ती पलीकडचे आहे. या ठिकाणी लेखापरीक्षण झाले तरी रुपयाचा भ्रष्टाचारही समोर येत नाही. कमालीच्या सफाईने येथील व्यवहार चालतात.
तंबाखू, सिगारेट अन् अमली पदार्थही
कारागृहात आलेल्या एखाद्या कैद्याला व्यसन असल्यास त्याला दरमहा हजारो रुपये खर्च करावे लागतात. तंबाखूची किंमत बाहेर दहा रुपये असल्यास कारागृहात त्याची किंमत शंभर रुपये असते. सिगारेटची तर किंमत सांगायलाच नको. याहीपेक्षा पैसे मोजल्यास गांजाही हमखास मिळतो. त्यामुळे पैसे असलेल्या कैद्यांना चमचमीत जेवण, दूध, अंड्यांचा खुराक व अमली पदार्थ मिळत असल्यामुळे ते ऐशआरामात कारागृहातील जीवन जगतात. सभोवती टोळी जमवून कारागृहावर काहीजण जणू राज्य करताना दिसतात. अशा कैद्यांना कारागृहात व्हीआयपी वागणूक मिळते. कारागृहातील तुरुंगरक्षकही त्यांच्या दिमतीला असतात. पाहिजे तेव्हा ते मोबाईलवर बाहेर संपर्क करू शकतात. काहीजण गुन्हेगारी सूत्रे कारागृहातून हलवतात. त्यांना साहजिकच कारागृहातील मंडळींची मदत असते. याचा थांगपत्ता ना कारागृह प्रशासनाला असतो ना पोलिसांना.
गुन्हेगारांचे विद्यापीठ
येरवडा मध्यवर्ती कारागृह हे गुन्हेगारांचे विद्यापीठ म्हणून संबोधले जाते. कारण याच ठिकाणी अनेक गुन्हेगारी टोळ्या तयार होतात. नवीन आलेल्या कैद्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना आपल्या टोळीत सामील करून घेण्याचे प्रयत्न केले जातात. या ठिकाणी नवीन कैद्यांना दिवस-रात्र जणू एक प्रकारचे प्रशिक्षणच देणे सुरू असते. गुन्हेगारी विश्वातील तंत्र आणि मंत्र हे कैदी शिकत असतात. त्यामुळे बाहेर जाऊन गंभीर गुन्हे करणे आणि पुन्हा आत येणे असे चक्र नेहमी सुरू असते. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात येरवडा कारागृहाला गमतीने गुन्हेगारांचे विद्यापीठ म्हटले जाते. एवढेच नाही तर येथे आलेले कैदी विविध गुन्ह्यातील असतात. त्यामुळे त्यांचे खटले, वकिलांबद्दल चर्चा करता करता त्यांना कायद्याचीही चांगली ओळख होते. ते इतरांनाही याबाबत विधी साक्षर करतात. चांगले वकील सुचवितात तर काहीजण एखाद्याला आर्थिक मदत करून बाहेर काढण्यासाठी मदतही करतात.
सात हजारांच्या वस्तीचे गाव
येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रवेश केल्यानंतर कारागृह इमारतीत तळ आणि पहिला मजला आहे. तळमजल्यावर वरिष्ठ तुरुंगाधिकारी, तुरुंग अधिकारी यांचे कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालय व कारागृह अधीक्षकांचे कार्यालय आहे. कारागृहात तीस बराकी आहेत. यासह मध्यवर्ती भागात सेंट्रल किचन, गिरणी, किचन शेजारी दोन बराकी, धान्य गोदाम, रुग्णालय, प्रयोगशाळा, औषधांची खोली, वैद्यकीय अधिकाऱ्यांची खोली, मुलाखत कक्ष, ग्रंथालय, मनोरंजन सभागृह, सराईत गुन्हेगारांसाठी अतिसुरक्षित खोल्या आदींची रचना आहे. एकप्रकारे सात हजार कैद्यांचे एक गावच येथे वसले आहे.
"कारागृहातील कैद्यांना जेवण सरकारने नेमून दिलेल्या प्रमाणात असते. यासह येथील भांडारातील वस्तू एमआरपीप्रमाणे दिल्या जातात. कारागृहात अमली पदार्थ मिळत नाहीत."
- सुनील ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह