फुरसुंगीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
#हडपसर
फुरसुंगी येथील भोसले व्हिलेजमधील लक्ष्मी निवासमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील तिघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर दोघांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे ( वय ७०, लक्ष्मी निवास, फुरसुंगी, हडपसर) यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे, तर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे (६०) आणि चेतन सूर्यप्रकाश अबनावे (४१) यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अबनावे कुटुंब लक्ष्मी निवासमध्ये राहण्यास आहे. सोमवारी त्यांनी राहत्या घराचा दरवाजा आतून बंद करून विषारी औषध प्राशन केले. त्यामध्ये सूर्यप्रकाश अबनावे यांचा मृत्यू झाला आहे. इतर दोघांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांनी एकदाच विषारी औषध का प्राशन केले हे अद्याप समजू शकलेले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.