Shivsena UBT Pune : पुण्यात शिवसेनेला (उबाठा) पडणार खिंडार; पाच माजी नगरसेवक करणार भाजपात प्रवेश

पुणे : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण झालेला पराभव आणि भाजपा महायुतीला मिळालेले अभूतपूर्व यश यामुळे महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Wed, 1 Jan 2025
  • 01:44 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण झालेला पराभव आणि भाजपा महायुतीला मिळालेले अभूतपूर्व यश यामुळे महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. भाजपाने आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने विरोधी पक्षांचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यासाठी पक्षाची दारे खुली केली आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेमधील (उबाठा) पाच माजी नगरसेवक पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेला (उबाठा) शहरात मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाकडून उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का दिला जाणार असल्याची जोरदार चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. २०२५ मध्ये महानगरपालिका निवडणुका होणार असल्याची शक्यता असल्याने सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जाण्यात माजी नगरसेवक अधिक रुची दर्शवीत असल्याचे चित्र आहे. येत्या ५ जानेवारीला मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या माजी नगरसेवकांचा प्रवेश होणार आहे. बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे या नगरसेवकांसह प्राची आल्हाट, संगीता ठोसर, पल्लवी जावळे या नगरसेविका भाजपात प्रवेश करणार आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मोठे यश मिळाले. सर्वाधिक जागा भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी या पक्षांनी खेचून आणल्या. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतपत देखील यश महाविकास आघडीच्या पदरात पडले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या दुसऱ्या फळीतील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना आपल्या राजकीय भवितव्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी आणि संभाव्य उमेदवारांची जंत्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यातही महायुतीचा आत्मविश्वास दुणावलेला असल्याने विधानसभेप्रमाणेच अधिक यश महापालिका निवडणुकांमध्ये खेचून आणण्याचे नियोजन केले जात आहे.

आपल्या राजकीय भवितव्याबाबत साशंकता असल्याने महाविकास आघाडीमधील अनेकजण महायुतीमध्ये डेरेदाखल होण्याची शक्यता आहे. विशेषत: भाजपाकडे ‘इनकमिंग’चे प्रमाण अधिक असणार आहे. त्याची सुरुवात या पाच नगरसेवकांच्या संभाव्य प्रवेशाने होत असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकाधिक लोकप्रतिनिधी निवडून आणण्यावर महायुतीचा जोर असणार आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ता या निवडणुकीत पथ्यावर पडणार असल्याचे विरोधी पक्षातील संभाव्य उमेदवारांच्या लक्षात आल्याने आता पक्ष दबलांचे वारे वाहू लागले आहे.

याबाबत ‘सीविक मिरर’शी बोलताना माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल म्हणाले, की भाजपामध्ये माझ्यासह माजी नगरसेवक विशाल धनवडे आणि प्राची आल्हाट, संगीता ठोसर, पल्लवी जावळे या नगरसेविका भाजपात पाच जण प्रवेश करणार आहोत. याविषयी आम्ही पूर्ण विचार करून निर्णय घेतला आहे. याविषयी प्रवेशानंतर विस्ताराने अधिक बोलणार असल्याचे ते म्हणाले.

Share this story

Latest